काव काव काव…आजूबाजूच्या गल्लीत जवळपास सगळीकडेच काव काव काव अशी हाक मारताना दिसणारे पाहिले किंवा कानावर पडणारे आवाज ऐकले की समजावं पितृपक्ष सुरू झाला आहे. अनंत चतुर्दशीनंतर पौर्णिमा झाली की पितृपक्ष चालू होतो तो सर्वपित्री अमावस्येला संपतो. यास ‘पितृ पंधरवडा’ असेही म्हणतात. कोकणात याला ‘म्हाळवस’ असा शब्द प्रचलित आहे.
एरवी हाट हाट करून गॅलरीत किंवा अंगणात येणाऱ्या कावळ्यांना उडवून लावले जाते; पण पितृपक्षात मात्र त्यांचा मोठा मान असतो. पितृपक्षातील श्राद्धात ठेवल्या जाणाऱ्या पिंडाला किंवा वाडीला कावळ्याने चटकन येऊन शिवले की त्या घरातील मंडळींना धन्य झाल्यासारखे वाटते.
असे मानले जाते की जर त्या आत्म्याची कशातच वासना राहिलेली नसेल तर पटकन कावळा त्या पिंडाला शिवतो. अन्यथा तासनतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही. असं म्हणतात की, फक्त कावळा आणि कुत्रा या दोनच प्राण्यांना मृत्यू व आत्मा दिसतो. कावळ्याला पितृपक्षात एवढे महत्त्व देण्याची आणखीही बरीच कारणे आहेत. माणसांना फक्त उजेडातच दिसते. मांजराला उजेडात तसेच अंधारातही दिसते. वटवाघूळ व घुबडाला फक्त अंधारातच दिसते. यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्यास मिळाली आहे, असं मानलं जातं. आज आपण एवढी वैज्ञानिक प्रगती केलेली असली आणि डोळ्याप्रमाणे लेन्स तयार केली असली तरी जीवात्मा पाहू शकलेलो नाहीत. कारण लेन्स तयार झालेली असली तरी तिच्यात ती कावळ्याची दृष्टी पाहण्यासाठीचे प्राण नाहीत!पितृपक्षात आणि श्राद्धात मोठा मान असणाऱ्या कावळ्याबद्दल कुतूहलापोटी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता रंजक माहिती मिळाली ती अशी – कावळ्याची स्मरणशक्ती खूपच चांगली असते तसेच तो खूप बुद्धिमानही आहे. कावळ्याबद्दल असेही म्हटले जाते की तो एकाच डोळ्याने पाहू शकतो, म्हणून त्याला ‘एकाक्ष’ म्हणतात.जुनी जाणती वयोवृद्ध मंडळी तर कावळ्याने कुठे घर बांधले आहे यावरून पावसाचा अंदाज ठरवतात. वनअभ्यासक, साहित्यिक व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकातून या विषयी अधिक माहिती मिळते. काही ठिकाणी रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे, यास काकबली असे म्हणतात. व्यकंटेश स्तोत्रात ‘काकविष्ठेचे झाले पिंपळ’ असे म्हटले आहे. कारण पिंपळ, वड यांसारख्या झाडांची फळे कावळे खातात. त्यांच्या विष्ठेतून वडपिंपळाच्या बिया बाहेर पडतात आणि त्या रुजतात. महाराष्ट्रातच नाही तर इतर अनेक देशांमध्ये सुद्धा निरनिराळ्या पद्धतीने पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणजेच ही कृतज्ञ राहण्याची भावना जगाच्या पाठीवरही एकसारखीच आहे.
पितृपक्षात आपले पितर, आपले पूर्वजच आपल्याला आशिर्वाद द्यायला येतात तर मग पितृपंधरवडा हा अशुभ कसा मानायचा? हे दिवसही शुभ मानायलाच हवेत की! त्या निमित्ताने मदत, दानधर्म किंवा काही सामाजिक कार्य केले तर आपल्या पूर्वजांना ते नक्की आवडेल. कावळ्याच्या रूपाने आलेला त्यांचा आत्माही पिंडाला नक्कीच शिवेल आणि आपले पूर्वज आपल्याला भरभरून आशिर्वाद देतील. कावळ्याची वाडी ठेवताना ती अशा जागी ठेवली तर जेणेकरून सगळीकडे ते अन्न सांडणारही नाही आणि कावळा अथवा इतर पशुपक्षी ते अन्न खाऊ शकतील.
जन्मानंतरचा पहिला घास काऊच्या साक्षीनं खाणाऱ्या माणसाचा शेवटचा प्रवास कावळ्याच्या उपस्थितीशिवाय अपूर्ण आहे, एवढं मात्र खरं. आपल्या धार्मिक परंपरेचा, विधीचा आदर राखून त्याला आधुनिकतेची जोड देऊन सामाजिक बांधिलकीतून पितृपक्षातील कार्य करायला काय हरकत आहे. त्याचप्रमाणे आताच्या या काळात सहजासहजी न दिसणारा कावळा पक्षी पुढे जाऊन नामशेष होणार नाही ना याचीही काळजी घ्यायला हवीच आहे…नाहीतर वड, पिंपळ यांसारख्या वृक्षांच्या जातीही नामशेष होतील की. निसर्गाचे हे चक्र असेच अबाधित राहण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत.अन्यथा अजून काही वर्षांनी चिऊ ये… .काऊ ये…असे म्हणताना हे पशुपक्षी फक्त पुस्तकातूनच हजेरी लावतील.या सर्व बाबींचा विचार करून निसर्गाचा समतोल सांभाळून पिंडाला शिवण्यासाठी येणाऱ्या आत्मरूपी कावळ्याला सद्भावनेने नमस्कार करून म्हणावे काव काव काव…ये…रे…ये…
पूर्णिमा नार्वेकर, दहिसर