भाजपा व्यापारी आघाडीसह तुळशीबाग व गणपती व्यापारी संघटनेचे महापालिका पदाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे, दि. 25 मे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. आणि व्यापारी वर्ग लॉकडाऊनमुळे त्रस्त झाला आहे. कोरोनाचा फैलाव अधिक असताना दुकाने बंद ठेवण्यास सर्व व्यापारी वर्गाने सहमती दर्शवली. आता कोरोना आटोक्यात आला असल्याने येत्या 1 जून पासून जीवनावश्यक वस्तुंच्या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीने केली आहे. त्यावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या दोन ते तीन दिवसांत यासंबंधी निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याची माहिती पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास यांनी दिली.
पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर तुळशीबाग व्यापारी संघटना व गणपती व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे यांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, प्रसिद्धी प्रमुख संजीव फडतरे, रविंद्र सारुक, अमर देशपांडे, सुनील गेहलोत, केतन अढिया, तुळशीबाग व्यापारी संघटनेचे किरण चौहान, जितेंद्र अंबासनकर, नितीन पंडित आणि गणपती व्यापारी आघाडीचे संजय मुनोत उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुणे शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. आता कोरोनाची लाट ओसरते आहे आणि आटोक्यात आली आहे. व्यापारी वर्गाने कोरोनाचा संसर्ग जास्त होत असताना लॉकडाऊन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयास सहकार्य केले. खरं तर, व्यापारी वर्गाचे प्रचंड आर्थिक नुकसान याकाळात झाले आहे. त्यास पुन्हा उभारी घेण्यासाठी आता दुकाने सुरु करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या 1 जून पासून इतर व्यवसायाची दुकाने व व्यापार सुरु करण्यास महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीने केली आहे. तुळशीबाग व गणपती व्यापारी आघाडीनेही यावेळी भाजपा व्यापारी आघाडीसोबत ही मागणी केली.
महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे यांनी व्यापाऱ्यांची बाजू, व्यापाऱ्यांच्या समस्या गांभिर्याने समजून घेतल्या. तसेच, येत्या दोन ते तीन दिवसांत यासंबंधी निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे महेंद्र व्यास म्हणाले.