पुणे : भिडे वाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे. येथे राष्ट्रीय स्मारक करून या वास्तूचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्या. याबाबत आज महापौर बंगला बैठक घेण्यात आली.
या बैठकीत माजी आमदार कमल ढोले पाटील, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, संदिप लडकत, दिपक जगताप, शारदा लडकत, मंजिरी धाडगे, नंदकुमार गायकवाड तसेच महापालिका उपायुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सन 1851 साली महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. आज ही ऐतिहासिक वास्तू मोडकाळीस आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्मारक म्हणून या वास्तूचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र सध्या येथे असणाऱ्या भाडेकरूंनी ही जागा देण्यास नकार दिला आहे. याबाबत त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.
त्यामुळे येथे स्मारक कारण्यास अडचण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेत या वास्तूला राष्ट्रीय स्मारक करण्याबाबतचा ठराव करून राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाला हा प्रस्ताव पाठवून राष्ट्रीय स्मारकांमध्ये समावेश करावा, शहराच्या विकास आराखड्यात ऐतिहासिक वास्तू म्हणून या वास्तूला आरक्षित करावं, त्याचप्रमाणे या भाडेकरूंशी चर्चा करून त्यांना महापालिके मार्फत योग्य पर्याय द्यावा व न्यायालयाबाहेर चर्चे द्वारे या प्रश्नावर मार्ग काढावा अशा सूचना श्री बापट यांनी दिल्या.