पुणे :- मुलं घरच्यापेक्षा शाळेत जास्त वेळ असतात. त्यामुळे तेथील शिक्षकांकडून घेतलेले ज्ञान आणि संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त कसबा मतदार संघातील काही शाळांना त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर ते शिक्षकांसमोर बोलत होते.
ते म्हणाले की शाळेत झालेले संस्कार ही आयुष्याची शिदोरी असते. त्यामुळेच शिक्षकांचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचे असते. गेली तीस वर्षे हा कार्यक्रम कसबा मतदार संघात होत आहे. शिक्षकांच्या प्रति आदर व्यक्त करणे त्यांना समाजात महत्वाचे स्थान मिळवून देणे हा त्यामागील उद्देश असतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. गुरूला वंदन करणे, त्यांना आदराचे स्थान देणे ही आपली संस्कृती आहे. एक शिक्षक आपल्या देशाचा राष्ट्रपती होतो ही आपली परंपरा आहे.
यावेळी नगरसेवक राजेश येनपुरे, हेमंत रासने, गायत्री खडके, अजय खेडेकर,सम्राट थोरात ,आरती कोंढरे, अशोक येनपुरे, प्रमोद कोंढरे, राजू परदेशी, वैशाली नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.