पुणे: सहकार चळवळीच्या इतिहासात एक विशेष क्षण म्हणून नोंदवला जाईल असा एक पुढाकार नुकताच घडून आला. बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींमध्ये प्रवर्तक ठरेल असा एक सामंजस्य करार घडून आला. त्यानुसार या दोन्ही संस्था समाजातील तळाचा वर्ग असलेल्या ग्रामीण व निम-नागरी लोकसंख्येच्या हितासाठी सहकार क्षेत्र चळवळीला अधिक चालना देणार असून संयुक्तपणे नेतृत्वही करणार आहेत. एखादी शिक्षण संस्था आणि सहकार क्षेत्रातील संस्था यांच्यातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच व अनोखा सहयोग करार आहे. त्याचाच भाग म्हणून या दोन्ही संस्थांनी सहकार क्षेत्र संशोधन व क्षमता विकास संबंधित सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले आहे. गेले काही महिने या केंद्राची उभारणी सुरु होती.
बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नेतृत्व संघात मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे व पुणे विभागीय व्यवस्थापक धनंजय पाटील यांचा समावेश आहे, तर विश्वकर्मा युनिव्हर्सिटीच्या नेतृत्व संघात अध्यक्ष भरत आगरवाल, कुलगुरु प्रा. डॉ. सिद्धार्थ जबडे, उपकुलगुरु प्रा. डॉ. शैलेश कासंडे यांचा समावेश आहे. शिरीष देशपांडे व भरत आगरवाल यांच्या हस्ते, अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी बोलताना शिरीष देशपांडे म्हणाले, “ब्रॅक्ट्स ट्रस्ट व विश्वकर्मा ग्रुपचे सामाजिक कार्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण क्षेत्रातील योगदान प्रशंसनीय आहे. ग्रामीण व निम-शहरी लोकसंख्येच्या हितासाठी व सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी शैक्षणिक व सहकारी संस्थांमधील सहयोगाचे अद्वितीय प्रारुप असलेल्या या सेंटर ऑफ एक्सन्सच्या माध्यमातून आम्हाला वित्तीय साह्य, कौशल्य विकास आणि सामाजिक सुधारणांसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे.”
विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष भरत आगरवाल म्हणाले, “बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सहयोगाने सहकार क्षेत्र संशोधन व क्षमता विकासाशी संबंधित असे सेंटर ऑफ एक्सलन्स हे अशा स्वरुपाचे पहिलेच केंद्र सुरु करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. ब्रॅक्ट्स ट्रस्ट व विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्स यांनी गेल्या ३५ वर्षांत शिक्षण, समाज कल्याण व जबाबदारी या क्षेत्रांत प्रचंड काम केले आहे. या नव्या केंद्राने राष्ट्र, तसेच समाजाच्या तळाच्या वर्गासाठी काम करावे, अशी माझीही अपेक्षा आहे.”
विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरु प्रा. डॉ. सिद्धार्थ जबडे म्हणाले, “ ग्रामीण व निम-शहरी भागांतील कमी उत्पन्न गटांच्या विकासासाठी यासारखे अनोखे सहयोग घडून येण्याची खूप गरज आहे. उत्पादकता वाढवणे व आर्थिक शाश्वतता यासाठी नवे तंत्रज्ञान व रचनांचा वापर करण्यास हे केंद्र उत्तेजन देईल. पुण्यात प्रथमच सहकार क्षेत्रातील संस्था व शैक्षणिक संस्था एकत्रितपणे काम करुन उत्पादकता व आर्थिक शाश्वतता वाढवण्यासाठी ग्रामीण व निम-शहरी लोकसंख्येला सक्षम करण्याच्या हेतूने पर्याय शोधून काढत आहेत, हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे.
या केंद्राचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे :
· येथे ग्रामीण व निम-शहरी लोकसंख्येला सक्षम बनवून त्यांची रोजगार क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी सहकार क्षेत्र संबंधित विषयांचे खास पदविका/पदवी अभ्यासक्रम दिले जातात.
· हे केंद्र उत्पादकता, कौशल्य व क्षमता वाढवण्याच्या हेतूने समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी कार्यक्रम, कार्यशाळा व व्याख्यानांचे आयोजन करते.
· हे केंद्र समाजाच्या गरजांची पूर्तता करते आणि कमी उत्पन्न गटांचा समावेशक व शाश्वत विकास, तसेच राष्ट्राची प्रगती घडण्यासाठी लघु उद्योग व स्वयं-सहाय्यता गटांना सक्षम करते.