पुणे, दि. २२ जुलै २०२२: डोंगराळ व अतिदुर्गम भागात वीजयंत्रणा उभारून प्रकाशमान झालेल्या गावांमध्ये महावितरणकडून ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पुणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरणाच्या विविध योजनांचा जागर करण्यात येणार आहे. यासाठी पुणे शहर व भोर (ता. भोर) येथे बुधवारी (दि. २७) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तसेच महावितरण, महानिर्मिती व महापारेषण यांच्या संयुक्त सहकार्याने राज्यभरात दि. २५ ते ३० जुलै दरम्यान ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य– पॉवर@२०४७’ या ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विद्युत योजनांमधून गावे, वाड्यावस्त्यांमध्ये, शेतात विजेचे ऊर्जीकरण झालेल्या लाभार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. ३० जुलैला नाशिक, वर्धा, कोल्हापूर, नंदूरबार व गडचिरोली या पाच जिल्ह्यांतील लाभार्थ्यांशी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधणार आहेत.
बुधवारी (दि. २७) आयोजित ‘आजादी का अमृत महोत्सवा’चा कार्यक्रम पुणे शहरामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) मिनी ऑडीटोरिअममध्ये सकाळी १०.३० वाजता तर भोर येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयामध्ये दुपारी ४.३० वाजता होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये ऊर्जा खात्याच्या विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. भोरपासून २५ किलोमीटरवरील पऱ्हर बुद्रुक गावाजवळील दुर्गम असलेल्या आखाडे वस्तीच्या विद्युतीकरणासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेमधून अडीच किलोमीटर लांबीची वीजवाहिनी उभारून स्वतंत्र रोहित्र उभारण्यात आले आहे व १४ लाभार्थ्यांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या पुर्ततेनिमित्त भोर येथे ‘आजादी का अमृत महोत्सवा’चा कार्यक्रम होणार आहे.
तसेच ‘आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, सौभाग्य योजना, कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, विलासराव देशमुख अभय योजना, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व कृषिपंप योजना, छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आदी योजनांसह वीजग्राहकांच्या हक्कांबाबत ध्वनीचित्रफितीद्वारे माहिती देण्यात येईल. सोबतच पथनाट्ये, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनी, पोस्टर्सद्वारे वीज क्षेत्रातील प्रगती व विविध माहितीचा जागर करण्यात येणार आहे.