भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर पश्चिम न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. रश्दी पश्चिम न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात उपस्थित असताना व्याख्यानापूर्वी त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. चौटौका इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
बुकर पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये चाकू हल्ला झाला. रश्दी बफेलोनजीक चौटाउक्वा संस्थेत व्याख्यान देणार होते. मंचावर परिचय देत असताना हल्लेखोराने त्यांच्या गळ्यावर 20 सेकंदात 15 वार करून ठोसे मारले. यात त्यांचा मोठा रक्तस्त्राव झाला. 75 वर्षीय रश्दींना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.
1988 मध्ये “सॅटनिक व्हर्सेस’ वरून त्यांच्याविरुद्ध फतवा निघाला व हत्येची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर 2000 पासून रश्दी अमेरिकेत वास्तव्यास आहेत.
हल्लेखोराला अटक
हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे वय 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने हल्ला का केला किंवा कोणाच्या आदेशावर हा हल्ला केला, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
रश्दींचा जन्म मुंबईत
रश्दी यांचा जन्म मुंबईत झाला. द सॅटॅनिक व्हर्सेस आणि मिडनाईट चिल्ड्रन यांसारखी पुस्तके लिहून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रश्दी यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या कांदबऱ्या तसेच त्यामुळे निर्माण होणाऱ्या वादामुळे रश्दी नेहमी चर्चेत असतात. दरम्यान, आज त्यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला. हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
मुंबईत जन्मलेले आणि बुकर पुरस्कार विजेते सलमान रश्दी यांचे ‘द सॅटॅनिक व्हर्सेस” नावाच्या पुस्तकास इराणमध्ये १९८८ पासून बंदी घालण्यात आली आहे. कारण अनेक मुस्लिमधर्मीय याला ईश्वरनिंदा मानतात. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूबद्दल बक्षीस देण्याचा फतवा जारी केला होता. रश्दींची हत्या करणाऱ्या व्यक्तीला ३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.