मुंबई- महाविकास आघाडीचे तत्कालीन सरकार अल्पमतात असताना त्यांनी घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून आम्ही पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगतला होता. आजच्या बैठकीत आम्ही औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“यासंदर्भातला ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्राकडे मान्यतेसाठी आम्ही पाठवू. त्याचा पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.एमएमआरडीए मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवते आहे. शिवडी-न्हावाशेवा हा देखील मोठा प्रकल्प आहे. असे प्रकल्प राबवताना त्यांनी ६० हजार कोटींचं कर्ज उभारण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटींसाठी शासन हमी देखील देण्यात आली आहे. जेणेकरून प्रकल्पांना निधी कमी पडणार नाही, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.