पुणे-एका ब्रेन डेड रुग्णांचे यकृत आज (दि.५) कोल्हापूर येथून ग्रीन कॉरीडोरचा उपयोग करून पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे आणण्यात आले. ज्युपिटर हॉस्पिटलची टीम हे यकृत कोल्हापूरहून घेउन सायंकाळी ५ वाजता निघाली व ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे ८ वाजता पोहोचली. ग्रीन कॉरीडोर हे कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत तयार करण्यात आले होते. या ग्रीन कॉरीडोर मार्फत यकृत केवळ ३ तासात पुण्यात पोहोचले. सर्व सामान्यपणे या प्रवासासाठी ६ तास लागतात.
कोल्हापूर येथील ३३वर्षीय व्यक्तीचा ३० एप्रिल रोजी अपघातात झाल्याने त्यांना त्वरित एस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले परंतु ४ मे ला रुग्णांने वैद्यकीय उपचारांना कोणताही प्रतिसाद दिला नसून काही आवश्यक चाचण्या केल्यानंतर ४ मे रोजी डॉक्टरांनी रुग्णास ब्रेन डेड घोषित केले. एस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर च्या मेडिकल टीमने ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांचे अवयवदाना संदर्भात समुपदेशन केले व त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला.
ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथील यकृत तज्ञांनी त्वरित कोल्हापूर येथे जाऊन ऑर्गन रिट्रीव्हलची प्रक्रिया आज दुपारीच पूर्ण केली.कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक (आय. जी. पी) विश्वास नांगरे पाटील व पुण्याचे पोलीस उपायुक्त(डी. सी .पी) अशोक मोराळे यांच्या सहकार्यामुळे ग्रीन कॉरीडोर द्वारा कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत यकृत केवळ ३ तासात आणता आले. ज्युपिटर हॉस्पिटल मधील ६० वर्षीय व्यक्तीच्या यकृताच्या विकारामुळे या रुग्णाला एक महिन्या पूर्वी त्यांच्या मुलीने यकृताचा काही भाग दान केला होता.योग्य उपचारा नंतर त्यांना घरी देखील सोडण्यात आले होते. मात्र एक महिन्या नंतर त्यांच्या यकृतामध्ये पुन्हा बिघाड झाल्यामुळे त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. ही गरज पाहून पुण्याच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने या यकृत प्रत्यारोपणाची मान्यता देऊन या रुग्णाचा जीव वाचवला.
ज्युपिटर हॉस्पिटल येथील यकृत तज्ञ डॉ.शरण नरुटे म्हणाले की, “ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी त्या रुग्णाच्या यकृत दानाचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अवयव दानाद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नवे जीवन देऊ शकते. एक व्यक्तीच्या अवयव दानमुळे जवळपास नऊ लोकांचे प्राण वाचू शकतात. अवयव दाना बाबतीत जनजागृकता वाढवण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटल प्रयत्न करीत आहे.”
यावेळी ज्युपिटर हॉस्पिटल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील राव म्हणाले, “यासारखे अधिक लोक अवयवदानासाठी पुढे येतात तर समाजाला फायदा मिळेल” पुढे ते असेही म्हणाले कि, “ आम्ही पोलीस महानिरीक्षक (आय. जी. पी) विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त(डी. सी .पी) अशोक मोराळे व आरती गोखले, समन्वयक (ZTCC) तसेच पुणे व कोल्हापूर वाहतूक नियंत्रण पथकाचे हि आभारी आहोत” तसेच या यकृत प्रत्यारोपणाच्या टीम मध्ये डॉ. सोमनाथ चट्टेर्जी व डॉ.शरण नरुटे यांचा समावेश होता आणि ट्रान्सप्लॅन्ट समन्वयक श्री सागर काकड ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर यांचे या सर्व प्रक्रियेत योगदान होते.