– ग्रामविकासासाठी व्यक्तीगत लक्ष घालून पाठपुरावा करणार असल्याचं दिलं आश्वासन
मुंबई-आपल्या देशाच्या प्रगतीसाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाची प्रगती होणं ही तितकंच गरजेच आहे.
हीच गरज ओळखून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकताच जव्हार तालुक्यातील दुर्गम
भागांचा आढावा घेतला. यावेळी या भागातील देहेरे, कोगदा व पाथर्डी ही गावं दत्तक घेणार असून विविध
योजना या भागात पोहोचाव्या यासाठी त्या व्यक्तिश: लक्ष देणार असल्याचं आश्वासन ही त्यांनी यावेळी
दिलं.
या दौरादरम्यान देहरेगाव व आश्रमशाळेला भेट देऊन त्यांनी तिथल्या विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या समस्या
जाणून घेतल्या. तर जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तिथल्या कुपोषित बालकांची विचारपूस
त्यांनी केली. त्यानंतर साईमहल येथील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), पालघर जिल्हा परिषद, जव्हार
पंचायत समिती आणि दिव्यज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिकपाळी व्यवस्थापन
आणि अस्मिता योजना जनजागृती कार्यशाळेला भेट दिली. दरम्यान यावेळी उत्कृष्ट अंगणवाडीसेविका
म्हणून काम केलेल्या सेविकांना किट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. तर अस्मिता
योजनेअंतर्गत पुरवठादार म्हणून नोंदणी केलेल्या तालुक्यातील सात बचत गटांना प्रमाणपत्र देऊन सन्मान
ही करण्यात आला.
दरम्यान जव्हार हनुमान पॉइंट येथील कौशल्या विकास विभाग व अनिता डोंगरे या संस्थेमार्फत
चालणाऱ्या फॅशन डिझाइन केंद्रालाही भेट दिली. त्यानंतर कुटीर रूग्णालयातील नव्याने उभारलेल्या
एसएनसीयू विभागाचे उद्घाटन करून विभागाची पाहणी केली. तर त्यानंतर शासकीय कन्या आश्रमशाळा,
साकूर येथे विद्यार्थिनींना मासिकपाळी व्यवस्थापन आणि व्यवस्थापन व अस्मिता योजनेची माहिती देऊन
तेथील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांनी कुपोषण शून्यावर आणणार असल्याचं आश्वासन दिलं. दिव्यज
फाऊंडेशनच्यावतीने त्या बोलत होत्या. तर मुलांची काळजी घेत असल्याने तुम्हीही त्यांच्या माता
असल्याचं अंगणवाडीसेविकांना त्यांनी म्हटलं. तसेच मी आणि तुम्ही मिळून कुपोषण नष्ट करू… मी
नेहमीच तुमच्या मदतीसाठी तत्पर असल्याचंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं.
अमृता फडणवीस यांनी घेतली देहेरे, कोगदा व पाथर्डी ही गावं दत्तक
Date: