मुंबई क्रिकेटला भारतीय क्रिकेटची पंढरीwindo का म्हणतात हे मुंबई क्रिकेटने भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाच्या आकडेवारीचा विचार केला तर सहज दिसून येते. तब्बल ४१ वेळा रणजी करंडक जिंकून देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी निर्विविवाद्पणे अधिराज्य गाजवले. भारतीय क्रिकेटच्या एकूण कसोटी धावांच्या एक तृतीयांश धावा मुंबईच्या क्रिकेटपटूंच्या बॅटमधून निघाल्या आहेत. असं काय दडलं आहे मुंबई क्रिकेटमध्ये जे भारतातील इतर क्रिकेटपेक्षा वेगळे आहे? याचाच मागोवा घेतला आहे प्रसिद्ध क्रिडा समीक्षक आणि मुंबई क्रिकेटचे अभ्यासक डॉ. मकरंद वायंगणकर यांच्याविश्वकर्मा प्रकाशन पब्लिकेशन्स “अ मिलियन ब्रोकन विंडोज” या पुस्तकात. मूळ इंगजीतील हे पुस्तक निमिष पाटगांवकर यांनी अनुवादित करून मराठीत मुंबई क्रिकेटची गाथा मांडली आहे. इंग्रजीप्रमाणेच मराठीतही ती वाचनीय ठरते.
मुंबईच्या दैदिप्यमान फलंदाजीच्या घराण्याची कथा फार रंजक आहे. मर्चंट, मांजरेकर, वाडेकर, गावस्कर ते तेंडुलकर, रहाणे पर्यंत फलंदाच्यांच्या कित्येक पिढ्यांनी हे फलंदाजीचे संस्कार जपलेले दिसतात. मुंबईचा क्रिकेटपटू खडूस म्हणून का ओळखतात, मुंबईचे फलंदाजीचे घराणे, मुंबईच्या यशाचा मूलमंत्र, कांगा लीग सारख्या अनोख्या स्पर्धेचे महत्व, मुंबईचे चित्तवेधक सामने, मुंबईचे दोन महान फलंदाज गावस्कर आणि तेंडुलकर यांच्यात तुलना याचा परामर्श या पुस्तकात घेतला आहे. मुंबईच्या इतक्या खेळाडूतून सार्वकालीन संघ बांधायचा झाला तर लेखकाला तुलनात्मक विश्लेषण करून कुठचे अकरा खेळाडू निवडावेसे वाटतात तसेच मुंबईच्या खेळाडूंना आणि मुंबईविरुद्ध खेळलेल्या खेळाडूंना मुंबई क्रिकेट बद्दल काय वाटते याचे रंजक वर्णन या पुस्तकात समाविष्ट आहे. लेखकाचा मुंबई क्रिकेटवरचा सखोल अभ्यास या लिखाणातून दिसून येतो.
विश्वकर्मा पब्लिकेशन्सने मराठीत आणलेल्या या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच मुंबईत झाले. प्रकाशनाला माजी भारतीय क्रिकेटपटू किरण मोरे, पारस म्हांब्रे तसेच मुंबईचे माजी कर्णधार अमोल मुझुमदार, मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज आणि आयडीबीआय फेडरल लाईफचे मुख्य कार्यकारी अधिकारी विघ्नेश शहाणे, मुंबईचा अष्टपैलू अभिषेक नायर, सुप्रसिद्ध क्रिडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी, ज्येष्ठ प्रशिक्षक विद्या पराडकर, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे प्रमुख श्री विशाल सोनी आणि क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर “मुंबई क्रिकेटचे अंतरंग …थेट क्रिकेटपटूंकडून” या कार्यक्रमात श्री. द्वारकानाथ संझगिरींनी क्रिकेटपटूंशी मुंबई क्रिकेटच्या विविध पैलूंवर संवाद साधला.