पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ; ३५० बॉडी कॅमेरे, ४ ड्रोन आणि ६५ वाहनांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Date:

‘वाढत्या शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा’ — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अमली पदार्थमुक्त महाराष्ट्रासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन

पुणे, दि. ३ नोव्हेंबर २०२६ (माय मराठी वृत्तसेवा) :

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत असून आगामी काळात या शहराची लोकसंख्या पुण्यापेक्षाही अधिक होण्याची शक्यता आहे. वाढत्या नागरीकरणामुळे गुन्हेगारीचे स्वरूप आणि पोलिसांसमोरील आव्हाने बदलत आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाने सज्ज राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.

३५० बॉडी कॅमेरे, ४ ड्रोन आणि ६५ नवीन वाहने

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे, चार ड्रोन आणि ६५ नवीन पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या प्रत्यक्ष कारवाईचे चित्रीकरण होणार असून आवश्यक माहिती कमांड अँड कंट्रोल यंत्रणेला उपलब्ध होऊ शकेल. ड्रोनमुळे गर्दीची ठिकाणे, मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम आणि बंदोबस्तावर हवाई देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही तसेच एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा (ITMS) शुभारंभही यावेळी करण्यात आला.

ताथवडेत पोलीस मुख्यालयासाठी ५० एकर जागा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र मुख्यालयासाठी ताथवडे येथे मंजूर करण्यात आलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पोलीस दलासाठी अत्याधुनिक मुख्यालय उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या नियोजनात दिवंगत अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले होते. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर ती देशातील अत्याधुनिक पोलीस आयुक्तालयांपैकी एक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोलिसांना चांगली निवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी पोलीस संकुलात २०० शासकीय निवासस्थाने

कार्यक्रमात पिंपरी पोलीस संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या संकुलात पिंपरी पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक एकचे कार्यालय, अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे विभागीय कार्यालय आणि २०० शासकीय निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, दिवंगत अजित पवार यांनी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी १८० कोटी रुपये मंजूर केले होते. पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पोलीस दलाला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चिखलीतील नवीन पोलीस आयुक्तालय इमारत, आळंदी पोलीस ठाण्याची नवीन इमारत, वाकड येथील अपर पोलीस आयुक्त कार्यालय, सायबर कार्यालय आणि वाहतूक विभागाच्या सुविधांचाही त्यांनी उल्लेख केला.

‘डायल ११२’चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आपत्कालीन डायल ११२ सेवेमुळे पोलिसांचा प्रतिसादाचा कालावधी सुमारे तीन मिनिटांपर्यंत कमी झाला आहे.

या बाबतीत पिंपरी-चिंचवड पोलीस दल राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी नमूद केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे गुन्हे तपास अधिक प्रभावी करता येतो. ‘तपास सारथी’ प्रणालीमुळे तपासाची सुरुवात ते आरोपपत्र तयार करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘तीन ते चार वर्षांत देश अमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार’

अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

पुढील तीन ते चार वर्षांत देश अमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला असून त्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

अमली पदार्थांची निर्मिती आणि वितरण साखळी मोडून काढणे, व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार करणे, समुपदेशन आणि जनजागृती करणे अशा उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

पालकांनीही आपल्या मुलांच्या वर्तनाकडे लक्ष देऊन व्यसनाधीनतेची लक्षणे दिसल्यास वेळीच समुपदेशन आणि उपचार करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात ‘नशामुक्त पिंपरी-चिंचवड’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित नागरिक आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थविरोधी शपथ दिली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पोलिसांकडून एक कोटीची मदत

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिवसाचे वेतन देऊन एक कोटी रुपयांचा निधी उभारला.

या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पोलिसांनी दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांना हक्काची घरे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’, ज्येष्ठांसाठी ‘ज्येष्ठानुबंध’

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘दिशा’ उपक्रमात सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना पोलीस दलाचा आधार मिळेल, तर ‘दिशा’ उपक्रम विद्यार्थ्यांना सकारात्मक मार्गदर्शन करेल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पोलीस दलाची कामगिरी, आधुनिक साधनसामग्री, नागरिक आणि उद्योगांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे,उमा खापरे,शंकर जगताप, सुनील शेळके, महेश लांडगे, शरद सोनवणे, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्यासह अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळ गावागावांत पोहोचला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित ४१ व्या...

हुंड्यासाठी सुनांचा छळ करण्याची विकृत प्रवृत्ती थांबली पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी डॉ. गोऱ्हे...