ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन, संशोधन आणि जनजागृतीवर भर
स्थायी समितीची प्रस्तावाला मान्यता
पुणे : भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना असलेल्या पुणे कराराच्या शताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेल्या या ऐतिहासिक कराराशी संबंधित दस्तऐवजांचे जतन, संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवाद आणि नव्या पिढीसाठी जनजागृती उपक्रम राबविण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी दिली.
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ रोजी येरवडा कारागृहात ऐतिहासिक पुणे करार झाला होता. या कराराला २०३२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय समाजव्यवस्थेतील वंचित घटकांचे राजकीय प्रतिनिधित्व, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने या कराराला विशेष महत्त्व आहे. या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाची तयारी आतापासूनच सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडे प्रस्ताव मांडण्यात आला होता.
पुणे कराराशी संबंधित तत्कालीन पत्रव्यवहार, दुर्मीळ छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि नोंदींचे संकलन करून त्यांचे जतन करण्यात यावे, अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा इतिहास नागरिकांसमोर आणण्यासाठी स्मृतिग्रंथ तयार करणे आणि संग्रहालयाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
पुणे कराराचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन विद्यापीठे, इतिहास संशोधक आणि अभ्यासकांच्या सहकार्याने परिसंवाद, व्याख्याने आणि संशोधन उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात येणार आहे. नव्या पिढीला या ऐतिहासिक घटनेची माहिती व्हावी, यासाठी डिजिटल माध्यमातून जनजागृती करण्याचीही सूचना प्रस्तावात करण्यात आली आहे.
येरवडा कारागृह परिसरातील प्रमुख रस्त्याला ‘पुणे करार स्मृती मार्ग’ असे नाव देण्याचाही या प्रस्तावात समावेश आहे. या माध्यमातून ऐतिहासिक घटनेची कायमस्वरूपी आठवण जपण्याचा उद्देश असल्याचे भीमाले यांनी सांगितले.
शताब्दी वर्षासाठी स्वतंत्र समितीचा प्रस्ताव
पुणे कराराच्या शताब्दी वर्षानिमित्त २०३२ मध्ये व्यापक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. पुणे करार हा भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे. या घटनेचा इतिहास, त्यामागील सामाजिक भूमिका आणि महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महापालिकेने पुढाकार घेतला असल्याचे भीमाले यांनी सांगितले.

