पेशवाई किती समृद्ध होती हे लक्षात येण्यासाठी शनिवारवाड्याचे पूर्वीचे वैभव दृश्य स्वरुपात दाखवा- मेधा कुलकर्णी
पराक्रमाच्या गाथा सांगत शनिवारवाड्याचा २९३ वा वर्धापनदिन साजरा
शनिवारवाड्याचा २९३ वा वर्धापनदिन : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे आयोजन
पुणे : मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतिक असलेला शनिवारवाडा….पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाची साक्ष देणारा वाड्याचा प्रत्येक दगड आणि दरवाजा….दिल्ली दरवाजाची उंची आणि भव्यता…वाड्याच्या प्रत्येक पावलावर असणारा इतिहास आणि अशा इतिहासाचा साक्षीदार बनून शनिवारवाड्याने अनुभवलेल्या पराक्रमाच्या गाथा सांगत शनिवारवाड्याचा २९३ वा वर्धापनदिन थाटात साजरा करण्यात आला.
यावेळी पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे पुणे रेल्वे स्थानक असे नाव द्यावे आणि शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने कुंदनकुमार साठे यांनी केली.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या २९३ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार वाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, संदीप खर्डेकर, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवे आणि कुटुंबिय, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर उपस्थित होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस यावेळी पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी जगन्नाथ लडकत यांनी शनिवार वाड्याच्या आणि पेशव्यांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली.
पेशवाई किती समृद्ध होती हे लक्षात येण्यासाठी शनिवारवाड्याचे पूर्वीचे वैभव दृश्य स्वरुपात दाखवा- मेधा कुलकर्णी
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेतले जाते. इतिहासाची जपणूक ऐतिहासिक वास्तूंच्या जपणूकीतूनच होते. दिवस साजरे करणे हे निमित्त आहे, परंतु त्यामुळेच भविष्यात इतिहास जिवंत राहील. शनिवारवाड्यामध्ये बुरुज आणि दरवाजा या शिवाय काहीच नाही. पर्यटकांना पाहण्यासारखी ठिकाणे पुण्यात निर्माण करावी लागतील. शनिवारवाड्याचे पूर्वीचे वैभव दृश्य स्वरुपात दाखवावे, म्हणजे पेशवाई किती समृद्ध होती हे लक्षात येईल.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेषत: सीएसआरच्या माध्यमातून प्रयत्न करायला पाहिजेत. शासकीय दृष्ट्या देखील हे शक्य असले तरी परवानग्या आणि इतर प्रक्रियेमुळे विलंब होऊ शकतो. सीएसआर निधी ने मोठी ताकद निर्माण केली आहे, असे त्यांनी सांगितले.