पुणे, दि.२ डिसेंबर: “आधुनिक आणि तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगती मुळे आपले जीवन अधिक आरामदायी बनले आहे. परंतु ते अधिक निरोगी किंवा शांततेचे नाही. जीनोम टू ओम हे आधुनिक विज्ञानाकडून मेटासायन्सकडे इच्छित संक्रमण शोधून काढतो. जीवनाच्या सर्व पैलूंमधील परस्परसंबंध ओळखून नैतिक आणि आध्यात्मिक अंतदृष्टी यांचे मिश्रण करते. हे सर्वांगीण वैज्ञानिक दृष्टिकोनावर जोर देते.” असे विचार यूजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘जीनोम टू ओम’ या विषयावर ते बोलत होते.
सत्राच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस व २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. चौधरी व डॉ.अनिल हिवाळे उपस्थित होते.
डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले,“ जीनोम गतिशील आधुनिक विज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो तर ओम वैश्विक चेतनेला अंतिम वास्तव म्हणून मूर्त रूप देतो. हे पुस्तक प्रायोगिक ज्ञान आणि उच्च शहाणपणा यांच्यातील अंतर भरून काढण्याचा एक प्रयत्न आहे. जीनोम टू ओम हे मेटा सोसायटीच्या अर्थपूर्ण प्रगतीची आशा देते आणि वैज्ञानिक प्रगती आणि कालातील मानवी मूल्ये यांच्यात सामंजस्याने पुढे जाण्याची आशा देते. तसेच सार्वत्रिक शांतता आणि कल्याणासाठी विविधतेमध्ये एकता शोधण्याच्या आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रवास सुरू ठेवण्यासाठी जीवनाचा ओम मार्ग आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन होणे गरजेचे आहे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते. सृष्टीवरील सर्व धर्म हे मानवाला कसे जगावे आणि कसे जगू नये याची शिकवण देतात. ओम यामध्ये संपूर्ण विश्वाचे ज्ञान समावलेले आहे.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात शिवव्याख्याते प्रा. नितिन बालगुडे पाटील यांनी ‘ मराठा तितुका मेळवावा’ या विषयावर सांगताना, छत्रपती शिवरायांचा काळच डोळ्यासमोर उभा केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी बरोबरच आजच्या काळात त्याचा उपयोग कसा करावा हे सांगितले. छत्रपती राजांनी ज्या पद्धतीने राज्य कारभार केला ती पद्धत आज अस्तित्वात आणावी. तसेच राजांनी ज्या पद्धतीने संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केले तसेच आज प्रत्येक मराठी व्यक्ती ने देशात कुठेही काम करावे. असा सल्ला ही त्यांनी दिला.
तत्पूर्वी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी प्रेम आणि विश्वास या गोष्टीवर भर देऊन आज प्रत्येकाला प्रेमाची गरज का आहे हे सांगितले. प्रेमाच्या भावनेने शरीरात होणार्या हालचालीचे विस्तृतीकरण केले. त्यामुळे व्यक्तीची मन स्थिती किती उत्तम राहते हे समजावले.
सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पात्रे आणि डॉ. यांनी आभार मानले.