श्री पवार पुढे म्हणाले , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवामान अंदाज यंत्रणेकडून माहिती घेतली असता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पारंपरिक अवर्षणग्रस्त भागात पाऊस यंदा जुलै व ऑगस्ट महिन्यात खूप कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला गेला. मात्र सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली गेली होती. त्यामुळे आता सर्व भिस्त सप्टेंबर महिन्यातील पावसावर आहे.
सध्या उद्योग क्षेत्रात सर्वत्र मंदी दिसत आहे. पण बहुसंख्येने असणाऱ्या शेतकऱ्यांची क्रयशक्ती अथवा खरेदी शक्ती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ही मंदी दूर होणार नाही, असे मला वाटते.
बाजारभाव कमी आणावयाचे असल्यास खते आणि शेतीसाठी असणाऱ्या निविष्ठा यांचे भाव कमी करावे लागतील. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही कमी करावा लागेल. जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी भूमिका अधिवेशना दरम्यान मांडली.
हवामान आणि विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. दुष्काळा, गारपीट आणि अवकाळी पाऊस गेल्या काही वर्षांपासून नित्याचे झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतीवर प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदान सरकारने द्यावयास हवे. पीक कर्जे उपलब्ध करणे, तसेच शेती संदर्भातील दीर्घ मुदतीच्या कर्जाकरीता व्याज दर देखील कमी केले पाहिजेत. ज्या प्रमाणे स्टील उद्योग वाचवण्यासाठी केंद्र सरकारने कर कमी करण्याचे पाऊल टाकले, त्याप्रमाणेच शेती वाचवण्यासाठी हाच न्याय लावावा, अशी आमची मागणी आहे.
इंडोनेशिया देशात अतिशय कमी पाण्यावर अगदी कोरडवाहू प्रमाणे तग धरणारी (Drought Resistant) ऊसाच्या वाणाची लागवड केली जाते. ते वाण भारतात आणता येईल का, यासाठी वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काही सदस्य मी त्या देशांत पाठवणार आहे. कमी पाण्यावर ऊसाची शेती यशस्वी झाल्यास, शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा लाभ मिळेल.
अगोदर शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च कमी करा मगच शेतमालाच्या किमती कमी करता येतील- शरद पवार
पुणे – “”महागाई कमी करण्याच्या नावाखाली शेतमालाच्या किमती कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,अगोदर शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च कमी करा मगच शेतमालाच्या किमती कमी करता येतील ‘‘ असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. सामान्य माणूस आणि उत्पादक या दोघांच्याही हिताचे धोरण राबविण्याची गरज आहे; परंतु आज तसे होत नसल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड, सोपान कांचन या वेळी उपस्थित होते.