पुणे
” सर्कस ही लहान मुलांबरोबरच मोठ्यांचेही प्रमुख आकर्षण असते. सर्कसीतील वेगवेगळे चित्तथरारक प्रयोग पाहताना लहान मुलांना विशेष आनंद होतो. ‘रैम्बो सर्कस’ ने पुण्यात येऊन पुढील काही महिने पुणेकरांचे मनोरंजन करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद” असे गौरवोद्गार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी येथे काढले. डेक्कन येथील नदी पात्राच्या मैदानात उभारण्यात आलेल्या ‘रैम्बो सर्कस’ चे बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे उपस्थित होते.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आपल्या भाषणात, पुणे शहर हे सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे. त्यामुळेच सर्कसीच्या माध्यमातून होत असलेल्या कलेच्या जोपासनेसाठी या पुण्यनगरीने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे असे सांगून ‘रैम्बो सर्कस’ ला सदिच्छा दिल्या.
प्रारंभी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्ज्वलन करून ‘रैम्बो सर्कस’ च्या पुण्यातील शुभारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार विजय काळे, भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक, नगरसेविका नीलिमा खाडे, दत्ता खाडे, संदीप खर्डेकर, मंजुषा खर्डेकर, प्रवीण तरवडे, राजा महाजन, आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर ‘रैम्बो सर्कस’ च्या प्रमुख कलाकारांनी वेगवेगळे चित्तथरारक प्रयोग करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
याप्रसंगी भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे वारस अजय छत्रे व कल्पना छत्रे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्कस कलावंत दामू धोत्रे यांचे नातू व पणतू विलास धोत्रे व आनंद धोत्रे, मुन्नाभाई अब्रार, सिद्धार्थ जांभूळकर, बाळासाहेब शिंदे, नीना वाडेकर, दिलीप माने, आदी मान्यवर उपस्थित होते, प्रारंभी ‘रैम्बो सर्कस’ च्या वतीने प्रदीप अगरवाल यांनी स्वागत केले ‘रैम्बो सर्कस’ चे संस्थापक पी. टी. दिलीप आणि पार्टनर सुजित दिलीप यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी ‘रैम्बो सर्कस’ मधील देशी-परदेशी कलावंत आणि विदुषक मोठ्या संख्येने उपस्थित होते ‘रैम्बो सर्कस’ चा वातानुकुलीत तंबू प्रेक्षकांनी खचाखच भरून गेला होता.
‘रैम्बो सर्कस’ चा पुण्यात ४५ दिवस मुक्काम असून सोमवार ते शुक्रवार दुपारी चार आणि सायंकाळी सात असे प्रयोग होणार असून शनिवार, रविवार आणि सुट्टीचा दिवस यावेळी दुपारी एक, दुपारी चार आणि सायंकाळी सात असे तीन प्रयोग होणार आहेत. तिकिटाचे दर चारशे, तीनशे व दोनशे रुपये आहेत. तीन वर्षाखालील बालकांना मोफत प्रवेश आहे तसेच सामाजिक कृतज्ञता म्हणून अनाथ मुले, अंध व अपंग यांनही मोफत प्रवेश आहे.
सर्कसला लोकाश्रय असला तरी देशात १८ ते २० मोठ्या सर्कसी शिल्लक राहिल्या आहेत. मैदानाची भाडी बेसुमार वाढली असून वीज आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मोठा आर्थिक बोजा वाढत आहे. वाघ, सिंह, अस्वल यांना सर्कसीत प्रयोग करण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे उतरती कळा लागली आहे. त्याचबरोबर हत्तीवरही बंदी आणण्याचे प्रयत्न चालू असल्यामुळे भविष्यात सर्कस टिकेल कि नाही याची काळजी आहे. सर्कसीतील लहान मुलांना बालकामगार कायदा लागू केल्यामुळे त्यांना प्रशिक्षण देता येत नाही त्यामुळे भविष्यात सर्कस कलावंत तयार होतील कि नाही याची शंका आहे यासाठी सर्कस उद्योगाला केंद्र व राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी मदत केली पाहिजे असे याप्रसंगी सर्कसचे पार्टनर सुजित दिलीप यांनी सांगितले
‘रैम्बो सर्कस’ चे शानदार उदघाटन
Date: