पुणे- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आजपासून (25 व 26 जून) पुण्यात दोन दिवसीय दौ-यावर येत आहेत. राष्ट्रपती भवनाने मुखर्जी यांच्या दोन दिवसीय दौ-याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 4 वाजता पुणे लोहगाव विमानतळावर मुखर्जींचे आगमन होईल.
काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यातील भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या समारंभाला राष्ट्रपती आज सायंकाळी 5 वाजता हजेरी लावतील. शुक्रवारी सकाळी 11 वाजता पुण्यातील बालगंधर्व सभागृहात राष्ट्रपती उद्योजक प्रतापराव पवार यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करतील. तर शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभाला हजेरी लावणार आहेत.