नेरळ/रत्नागिरी
माथेरानच्या पायथ्याशी नेरळमध्ये मोहाची वाडी येथे आज पहाटे ५.३० वाजता एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला.तर रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये तीन घरांवर आज पहाटे दरड कोसळल्याने पाच गावकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत
मोहाची वाडी मधील किसन दिघे, सुनंदा दिघे, स्वप्नेश दिघे, अर्चना दिघे आणि जाई बाई कदम यांचा भिंतीच्या ढिगा-याखाली दबून मृत्यू झाला. प्रांताधिकारी राजेंद्र बोरकर आणि तहसीलदार रविंद्र बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तातडीने भिंतीचा ढिगारा उपसला आणि सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिले.
भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे नेरळमध्ये शोकाकूल वातावरण आहे. माथेरानच्या पायथ्याशी राहणा-यांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान खासदार श्रीरंग बारणै,पालकमंत्री प्रकाश मेहता,आमदार सुरेश लाड ,उपजिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये तीन घरांवर आज पहाटे दरड कोसळल्याने पाच गावकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, दरड उपसण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून दाभोळमधील टेमकरवाडीवर आज दरडीचे संकट कोसळले. लोक गाढ झोपेत असतानाच दरड कोसळल्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेली घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत पाच जण जागीच ठार झाले. सर्व मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून ५० जणांची टीम आणि तीन जेसीबींच्या सहाय्याने सध्या ढिगारा उपसण्याचे काम केले जात आहे.