सासवड :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ सेवेच्या दोन रूग्णवाहिकांद्वारे बोअरवेलमध्ये सात तास अडकलेल्या सोहम यादव या अडीच वर्षाच्या मुलाला तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यात आली. 18 फूट खोल असलेल्या बोअरवेल मध्ये अडकलेल्या सोहमला बाहेर काढल्यावर तातडीने ‘डायल 108’ सेवेद्वारे प्रथमोपचार करून पुण्यातील केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले.
सोहमच्या वडिलांनी आपल्या शेतामध्ये पाण्यासाठी बोअरवेल घेतलं होत. मात्र बोअरला पाणी न लागल्याने त्यावर पोते टाकून ते बोअरवेल झाकण्यासाठी दगड आणायला गेले बाजूला गेले. त्यावेळी जवळच खेळता खेळता सोहम पोत्यावर बसायला गेला आणि 18 फूट खोलवर बोअरवेलमध्ये पडला. दरम्यान घाबरलेल्या अवस्थेतल्या सोहमला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी डायल 108 च्या दोन सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह पोहोचल्यावर ऑक्सिजन आणि सलाईनद्वारे सोहमवर प्रथमोपचार करण्यात आले. या कार्यात ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ सेवेची पाच जणांची टिम कार्यरत होती, अशी माहिती इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ. विकास बनसोडे यांनी दिली.
माळशिरस (ता. पुरंदर) येथील माळशिरस-नायगाव रस्त्याला लागून लोळे वस्ती येथे सोहम याचे वडील राहुल साहेबराव यादव यांनी आपल्या शेतात नव्याने विंधन विहीर घेतली होती. ही विंधन विहीर पाणी न लागता कोरडी गेल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास विंधन विहिरीमधील क्रेसिंग पाइप काढून विंधन विहीर खोदाईची मशिन निघून गेली. त्यानंतर राहुल यादव यांनी त्या विंधन विहिरीवर गोणी झाकण म्हणून टाकले व त्यावर मोठा दगड बसवण्यासाठी तो आणण्याकरता बाजूला गेले. त्याचवेळी विंधन विहिरीशेजारी असणाऱ्या त्यांच्या अडीच वर्षे वयाच्या सोहम या मुलाने त्यावर पाय दिल्याने तो आतमध्ये पडला. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला.
माळशिरस येथील डॉ. भगत यांनी तातडीने घटनास्थळी येऊन कृत्रिम ऑक्सिजन विंधन विहिरीमध्ये सोडला. त्यानंतर प्रशासनाला माहिती कळविली. त्यानंतर दोन जेसीबी व एक जेसीबीच्या साह्याने विंधन विहिरीच्या कडेने खोदकाम सुरू करण्यात आले. घटनास्थळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, भोर उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते, जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र शेळके, मंडलाधिकारी गाढगे यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणा आली. अखेर सर्वांच्या मदतीने सोहमला बाहेर काढण्यात आले होते