पेशावर- पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड सद्दामला कंठस्नान घालण्यास पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. पाकिस्तानी जवानांनी जमरुद भागात केलेल्या कारवाईत क्रुरकर्मा सद्दामचा खात्मा करण्यात आला. जमरुदमधील गुंडी भागात सद्दामला ठार मारले असून त्याच्या एका साथीदाराला जिवंत पकडण्यात आले आहे. त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही. पेशावरमध्ये खैबर एजेंसीचे पॉलिटिकल एजेंट साहब अली शाह यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
शाह म्हणाले, सद्दाम हा तहरीक-ए-तालिबानच्या (पाकिस्तान) तारिक गेदार गटाचा कमांडर होता. पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. तालिबानी दहशतवाद्यांना सद्दाम यानेत प्रशिक्षण दिले होते. 2013 मध्ये खैबर पख्तून्ख्वामधील पोलियो टीमवर झालेल्या हल्ल्यात सद्दामचा हात होता. या हल्ल्यात 11 सुरक्षा जवान शहीद झाले होते. ‘ऑपरेशन खैबर-1’चा विस्तार करण्यात आला असून दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरु आहे.
दरम्यान, पेशावरमधील आर्मी स्कूलवर 16 डिसेंबरला झालेल्या दहशवादी हल्ल्यात 132 निरागस विद्यार्थ्यांसह 13 शिक्षकांचा मृत्यु झाला होता. सुरक्षा दलाच्या जवानांनी सात तालिबानी दहशतवाद्यांना ठार मारले होते.