दादा वासवानींचे अजित पवार यांना आशीर्वाद

पुणे:
‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’तर्फे समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबविण्यात येणार्या ‘कृतज्ञता गौरव’ उपक्रमाला आज दिनांक 11 जुलै रोजी सकाळी प्रारंभ करण्यात आला. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आज अजित पवार यांच्या हस्ते पद्मविभुषण डॉ.के.एच.संचेती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शं.ना.नवलगुंदकर, ज्येष्ठ शिल्पकार बी.आर.खेडकर, ज्येष्ठ उद्योजक हुकूमचंद चोरडिया, दादा जे.पी.वासवानी या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी 75 वर्षपूर्तीनिमित्ताने हे वर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत येत्या डिसेंबरपर्यंत 75 ज्येष्ठ / श्रेष्ठ नागरिकांचा त्यांच्या घरी जाऊन गौरव करण्यात येणार आहे. या सत्काराचे स्वरूप पुणेरी पगडी, मोत्याची माळ , पेशवाई उपरणे आणि सन्मानचिन्ह असे आहे.
नगरसेवक विजय (अप्पा) रेणूसे, विशाल तांबे, अभय मांढरे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘घरोघरी जाऊन गौरव करण्यात आपुलकी आणि जिव्हाळा असतो. सत्कारार्थींच्या कुटुंबियांना देखिल अभिमानास्पद वाटते.पत्रकारसंघाच्या अध्यक्षांचा सत्कार वैयक्तिक नसून प्रातिनिधीक आहे. हा सत्कार प्रत्येक पत्रकाराचा आहे. कला, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकिय, वैज्ञानिक अशा क्षेत्रात विशेष योगदान देणार्या वीभूतींचा गौरव या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहेत. सत्कारप्रसंगी सत्कारमूर्तींच्या दारापुढे रांगोळी काढण्यात आली तसेच सनई चौघडे वाजवून कृतज्ञता गुढी उभारण्यात आली. सत्कार मूर्तींचे कुटुंबिय अजित पवार स्वत: घरी येउन सत्कार केल्याने अतिशय भारावलेेले होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ.संचेती म्हणाले, ‘शरद पवार यांनी माणसे जोडण्याचे मोठे काम केले आहे. स्वत:च्या आरोग्याकडे जास्त लक्ष न देता सामाजिक कार्यात स्वत: ला झोकून दिले, तोच वारसा आणि पंरपरा अजित पवार पुढे नेत आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. अजित पवार यांचे वैक्तिमत्व अधिक तडफदार आणि आक्रमक आहे. त्यांची निर्णयक्षमता गतीशिल आहे. हा उपक्रम स्तुत्य असून या गौरवाने मला अतिशय आनंद वाटत आहे.
नवलगुंदकर म्हणाले, ‘स्वत:ची कामे बाजूला ठेवून पवार घराणे समाजाची सेवा करीत आहे. हे स्तुत्य आहे. शरद पवारांची सर्व क्षेत्रातील मैत्री जपणे, लोकसंग्रह वाढविण्याची हातोटी वाखाण्याजोगी आहे.’
दादा वासवानी म्हणाले,‘आपल्याकडे किती सेवक आहेत यावर मोठेपण ठरत नाही, तर आपण किती जणांची सेवा केली यावरून ठरते. सेवेशिवाय जीवन निरर्थक आहे. मी आजपर्यंत एकही पुरस्कार स्विकारला नाही परंतु हा सत्कार स्विकारताना मला विशेष आनंद होत आहे.’
यावेळी खासदार अॅड. वंदना चवहाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, अॅड. जयदेव गायकवाड, माजी उपमहापौर दिपक मानकर, माजी आमदार मोहन जोशी तसेच पक्षाचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते.
पुढील टप्प्यातील गौरवार्थीमध्ये संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर, कामगार नेते बाबा आढाव, साहित्यिक आनंद यादव, डी.एस.खटावकर, सुधीर गाडगीळ, पखवाजवादक तुकाराम भूमकर, निरंजन पंड्या, आशा काळे तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, कसबा गणपती आणि मंडई गणपती मंडळाच्या अध्यक्षांचाही समावेश आहे.