पुणे – देशासाठी ठरलेला “ब्लॅक वेन्सडे‘ 26/11चा दिवस…पोलिस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळे यांच्यामुळे पकडला गेलेला कसाब…त्यानंतर अवघ्या 98 अधिकारी, अंमलदार यांनी पूर्ण केलेलं तपास कार्य…अन् त्यानंतर सादर झालेले सुमारे 11 हजार 350 पानांचे आरोपपत्र, अशा प्रकारे दहशतवादी अजमल कसाबच्या चौकशीतील तपास कार्याचा अनुभव सांगत मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी “26/11‘च्या मुंबई हल्ल्यातील आठवणी सांगितल्या. या वेळी कसाबचे आरोपपत्र दाखल केल्यापासून त्याला फाशीपर्यंतचा प्रवास महाले यांनी पुणेकरांसमोर मांडला.
मेनका प्रकाशनतर्फे ब्रिटिश पत्रकार ऍड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क यांच्या “द सीज‘ पुस्तकाचा मराठी अनुवाद मंगळवारी महाले यांच्या उपस्थितीत एस. एम. जोशी सभागृहात प्रकाशित झाला. या पुस्तकाचा अनुवाद “साम टीव्ही‘चे ब्युरो चीफ अमित गोळवलकर यांनी केला आहे. या वेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, प्रकाशक आनंद आगाशे, अभय कुलकर्णी उपस्थित होते.
महाले म्हणाले, ‘मुंबईच्या हल्ल्यात अतिरेक्यांनी वापरलेले मोबाईल, जीपीएस यंत्रणा, मोटार बोटमधील मशिन, नागरिकत्वाचे पुरावे हे सगळे पाकिस्तानमधील असल्याचे कागदोपत्री पुरावे आम्ही दिले. म्हणूनच या वेळी पहिल्यांदा पाकिस्तान सरकारला हा कट आमच्याकडे शिजल्याचे मान्य करावे लागले. या हल्ल्याशी संबंधित पाकिस्तानमधील सात आरोपींवर सध्या खटला सुरू असला तरीही ते सरकार त्याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसते. त्यामुळे हा खटला किती दिवस चालेल हे सांगता येत नाही.‘‘
धर्माधिकारी म्हणाले, ‘कसाबने शस्त्र घेऊन भारताची सीमा ओलांडली होती. हे कृत्य देश व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्धाला आव्हान देणारे आहे. त्यामुळे त्याला न्यायालयात उभे करणे ही धोरणात्मक चुक होती. इस्लामिक दहशतवाद हा आज जगासमोरील आव्हान असून, त्याचे मुख्य केंद्र पाकिस्तानमध्ये आहे. देशा-देशांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हा दहशतवाद फोफावत आहे; परंतु हे रोखण्यासाठी आता इस्लाम आणि इस्लामिक दहशतवाद वेगळं करणे महत्त्वाचे ठरेल आणि हा बदल घडवून आणण्यासाठी भविष्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावेल.‘‘
गोळवलकर म्हणाले, ‘शोध पत्रकारिता, रिपोर्ताज आणि कादंबरीच्या अंगाने जाणारे हे पुस्तक आहे. यामध्ये पडद्यामागे राहून आपले कर्तव्य बजावलेल्या अनेकांच्या धैर्याचा उलगडा झाला आहे.‘‘ सूत्रसंचालन सुजाता देशमुख यांनी केले.
‘द सीज‘ पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन
Date: