कोल्हापूर – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार व श्रमिकांचे कैवारी गोविंद पानसरे ऊर्फ अण्णा (वय 78) व त्यांच्या पत्नी सौ. उमा (70) यांच्यावर सोमवारी सकाळी येथे प्राणघातक हल्ला झाला. दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. “मॉर्निंग वॉक‘ करून घरी परतत असताना शास्त्रीनगरजवळील आयडियल कॉलनी येथील घराजवळ सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. पानसरे यांची प्रकृती स्थिर, पण चिंतानजक असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्र मिकांच्या, मागासलेल्या समाजाच्या, शोषित वर्गाच्या समस्यांवर आंदोलन करणारे, अन्याय, अत्याचाराविरोधात खंबीरपणे लढणाऱ्या पानसरे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. कोल्हापुरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध फेरी काढून काही ठिकाणी घोषणाबाजीही केली. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद राहिले.
गृह राज्यमंत्री राम शिंदे सायंकाळी रुग्णालयात आले. ते आल्याचे समजल्यावर कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. “लडेंगे, लडेंगे; और भी लडेंगे‘ अशी घोषणाबाजी करून त्यांची मोटार अडविण्यात आली. अखेरीस रुग्णालयाच्या मागील दरवाजातून त्यांना बाहेर काढण्यात आले.