चेन्नई- तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना बेहिशोबी संपत्ती गोळा केल्यावरून झालेल्या शिक्षेत तुरुंगवारी झाल्यानंतर आत्महत्या करणा-या 244 लोकांच्या कुटुंबियांना एआयएडीएमकेने 7. 34 कोटी रुपयेपेक्षा जास्त मदत दिली आहे. गेल्या वर्षी स्थानिक कोर्टाने जयललिता यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती. त्यामुळे तामिळनाडूत शेकडो लोकांनी हा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली होत्या. दरम्यान, जयललिता यांची 11 मे रोजी कर्नाटक हायकोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे .
एआयएडीएमकेच्या वतीने शनिवारी जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत आत्महत्या केलेल्या 244 लोकांच्या कुंटुंबियांना 7.32 कोटी रूपये दिले गेले आहेत. दोन ते चार लाख रुपये कुटुंबियांना वैद्यकीय उपचारासाटी दिले आहेत. गेल्या वर्षी आत्महत्येच्या घटना वाढल्यानंतर खुद्द जयललिता यांनाच आवाहन करावे लागले होते.
एआयएडीएमके प्रमुख जयललिता यांनी 22 मे रोजी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. याचबरोबर पुन्हा एकदा जयललिता यांना मुख्यमंत्री बनविण्याची तयारी सुरु झाली आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सर्वसंमतीने पक्षाच्या विधीमंडळ नेता म्हणून निवडल्या जातील. त्यानंतर त्या सरकार बनविण्याचा दावा करतील. त्या 22 ते 24 मे दरम्यान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गेल्या वर्षी 27 सप्टेंबर रोजी बेहिशोबी संपत्तीच्या प्रकरणावरून त्यांना स्थानिक कोर्टानो दोषी धरताच त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यांनी आपले खास समर्थक पनीर सेल्वम यांना मुख्यमंत्री बनवले होते.