गणेशोत्सवाचे सामाजिक व राष्ट्रीय रूप अधिक बळकट करूया ! कै. अप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दी निमित्त ज्ञानप्रबोधिनीचा निर्धार
पुणे :
ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सर्व प्रमुख गणेशोत्सव मंडळांचा स्नेहमेळावा दि. 30 ऑगस्ट 2015 रविवार रोजी संपन्न झाला. प्रमुख मंडळांच्या सदस्यांनी कै. आप्पा व ज्ञान प्रबोधिनी यांच्या गणेशोत्सवातील विविध कामांबद्दलच्या स्वत:च्या आठवणी जागवल्या. माजी महापौर शांतीलाल सुरतवाला आणि माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई यांनी कै. आप्पांबरोबर समाज ऐक्य समिती स्थापन करतानाचे अनुभव सांगताना सामाजिक ऐक्यासाठी गणेशोत्सवाचे महत्त्व विषद केले. राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय विचारसरणी युवकांमध्ये रुजवण्याचे काम कै. आप्पांनी केले असे मत श्री. मोहन गुजराथी यांनी मांडले. तसेच, गणेशमंडळांचे प्रतिनिधी सूर्यकांत पाठक, बबन पांडे, नंदू घाटे, रवींद्र रणधीर, पराग ठाकूर, आनंद सराफ, नवनाथ जाधव यांनी गणेशोत्सवातील विधायक सहभागाबद्दल मंडळांना आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप करताना ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट म्हणाले ‘ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांनी बर्ची नृत्य, भगवा ध्वज लावणे, सर्व जाती धर्मांच्या स्त्री पुरुषांच्या हस्ते गणपतीची पूजा व आरती करणे, देवादासीनाही पूजेचा मान देणे, प्रतिष्ठापनेची वेगळी पोथी अशा काही सुधारणा गणेशोत्सवात रूढ केल्या. त्यांच्या जन्म शताब्दी वर्षात त्यांनी सुरू केलेले काम पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी करूया.’
ते पुढे म्हणाले, ‘ॠषीपंचमीला तिसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी विद्यारंभ संस्कार, गौरी विसर्जनानंतर मातृभूमीपूजन, गणेश प्रतिष्ठापनेच्या व आरतीच्या वेळी समूह भावनेला पोषक व समजघडणीचे सामुहिक संकल्प करूया. याची पहिली पायरी म्हणून किमान हिंदुस्थानची स्वयंभू चित्रमूर्ती आपल्या मंडपात ठेवूया. आरतीनंतर तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना म्हणूयात. या सारखे गणेशोत्सवाला विधायक वळण देणारे कार्यक्रम सुरु करू शकलो तर गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाच्या दिशेने आपण काही पावले टाकू शकू.’
गणेशोत्सवाला विधायक वळण देण्याच्या प्रयत्नात ज्ञानप्रबोधिनीच्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे’, असे मत गणेशोत्सव चळवळीत कार्यरत मान्यवरांनी व्यक्त केले. ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कै. अप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित गणेशोत्सव कार्यकर्ते, मंडळाच्या स्नेहमेळाव्यात हे मत व्यक्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक जोग यांनी केले. याप्रसंगी आशुतोष बारमुख, तुषार माडीवाले, आकाश चौकसे, ओंकार प्रधान, सोहम केळकर उपस्थित होते.