पुणे – नवी दिल्लीतील ‘एबीएस रिसर्चर्स’तर्फे ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’ची वर्ष २०१७ साठी ‘बेस्ट सीबीएसई स्कूल इन महाराष्ट्र’ म्हणून निवड करण्यात आली असून त्यासाठी पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
भारतभरातील सीबीएसई शाळांचे विस्तृत बाजारपेठीय संशोधन करुन त्याआधारे हा आढावा घेण्यात आला. त्यासाठी पायाभूत सुविधा, अध्यापन पद्धत, विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद, सहशिक्षणात्मक व अभ्यासक्रमेतर उपक्रम, विद्यार्थी व्यक्तीमत्त्व विकास, अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम, शिस्त, विद्यार्थ्यांची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी, क्रीडा उपक्रम, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठीचे आरोग्य कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक जाणीव आदी विविध निकष वापरण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत अभिनेत्री व समाजवादी शर्मिला टागोर यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका शानदार कार्यक्रमात नुकताच हा पुरस्कार सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. शीला ओक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. भारतभर शैक्षणिक संस्थांच्या होत असलेल्या भरमसाट वाढीबद्दल शर्मिला टागोर यांनी यावेळी काळजी व्यक्त केली. तरुणाईचे भवितव्य सुरक्षित बनवण्यासाठी लोकांना योग्य त्या शिक्षण संस्थांकडे वळण्याचे मार्गदर्शन करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांचे कल्याण व विकासाप्रती समर्पित अशा खरोखर उत्तम शाळा व महाविद्यालयांना ओळखून पुरस्काराद्वारे गौरवण्याच्या ‘एबीएस रिसर्चर्स’च्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. त्याचवेळी अशा संस्थांनी शाळा अथवा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हाती घेतलेले काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.
पुरस्कार स्वीकारताना ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या मुख्याध्यापिका सौ. शीला ओक म्हणाल्या, की विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत भावी जागतिक नेते बनवण्यासाठी त्यांचा कल्याणकारी विकास साधणारे सुयोग्य साचे पुरवणे, ही शिक्षण संस्थांचे व्यवस्थापन व शिक्षकांची प्रमुख संयुक्त जबाबदारी आहे. ‘सूर्यदत्ता’मध्ये विद्यार्थ्यांना सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण पुरवण्याबाबत आणि त्यांच्या एकंदर बुद्ध्यंकाला चेतना देणारे वातावरण निर्माण करण्याबाबत शिक्षकांना आत्मविश्वास असतो. उद्याचा ताकदवान, कुशल, स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण भारत घडवण्यासाठी तरुण पिढीत प्रारंभीच्या टप्प्यातच योग्य चारित्र्य, संस्कृती व कल्पकतेची बीजे रुजवणे अगदी आवश्यक आहे.
पुरस्कार समारंभाला उपस्थितांमध्ये उपयोजित विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय व व्यवस्थापन, शुश्रूषात्मक व आरोग्य विज्ञान, जैवऔषधी, कृषीविज्ञान व पर्यावरण तंत्रज्ञान आदी विविध शैक्षणिक क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. भारतीय शिक्षण आणि विद्यार्थी विकासाची अन्य क्षेत्रे यातील सर्वोत्कृष्टतेसाठी ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’ बजावत असलेल्या असाधारण कार्याबद्दल उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली.
“सूर्यदत्ता नॅशनल स्कूलने शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांत विद्यार्थ्यांच्या निश्चित यशासाठी कल्पक पद्धतीने अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन शिक्षण क्षेत्रात अल्प कालावधीत निःसंशय लक्षणीय परिणाम घडवून आणला आहे,” अशी प्रतिक्रिया ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली आहे.