‘ गुरुकुल विश्वपीठ ‘ तर्फे ९ डिसेंबर रोजी पुण्यात अखिल भारतीय ज्योतिषी संमेलन
पुणे :’ गुरुकुल विश्वपीठ ‘ तर्फे रविवार ,९ डिसेंबर रोजी पुण्यात अखिल भारतीय ज्योतिषी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन मौलाना आझाद सभागृह ( कोरेगाव पार्क ) येथे सकाळी १0 ते ५ या वेळेत होईल, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने डॉ . अजयचंद्र भागवत गुरुजी यांनी पत्रकाद्वारे दिली.
ज्येष्ठ कवयित्री व ज्योतिष अभ्यासक प्रतिभा शाहू मोडक, ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिध्देश्वर मारटकर , गुरुकुल विश्वपीठ ‘ चे संस्थापक डॉ. अजयचंद्र भागवत गुरुजी, संयोजक पल्लवी भागवत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सिध्देश्वर मारटकर हे उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थांनीं असतील . समारोप पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. समारोप सत्राला महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदिश मुळीक उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात उद्घाटन सत्रानंतर ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर हे २०१९ च्या निवडणुकीवर ज्योतिष अंगाने भाकितावर प्रकाश टाकणार आहेत.
नवीन तंत्रज्ञान आणि ज्योतिष , ‘थिंक लॉजिकली, अप्लाय अॅस्ट्रोलॉजीकली’, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि ज्योतिष, हस्ताक्षर आणि ज्योतिष ,नक्षत्र आणि ज्योतिष ,नवे ग्रह आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव अशा अनेक विषयांवर व्याख्यान सत्रे या संमेलनात आयोजित करण्यात आली आहेत.
ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट,नंदकिशोर जकातदार, डॉ.मधूसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे , डॉ . श्रीहृदय भागवत, रजनी साबदे इत्यादी मान्यवर विविध व्याख्यान सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
ज्योतिष क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव प्रदान ,पुस्तक प्रकाशन असे अनेक कार्यक्रम या संमेलनात होतील .