पुणे-भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यावरून पतित पावन संघटनेने महापालिकेमध्ये महापौर दालनाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आयुक्त तसेच आरोग्य विभागविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पीपीएस आक्रमक (व्हिडिओ)
पुणे-भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यावरून पतित पावन संघटनेने महापालिकेमध्ये महापौर दालनाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आयुक्त तसेच आरोग्य विभागविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शहरात भटक्या कुत्र्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींवर अशा कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आतापर्यंत या भटक्या कुत्र्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करूनही त्यांच्या संख्येवर निर्बंध येत नाही. त्यामुळे कुत्र्याचा बंदोबस्त करण्यावरून पालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरी पालिका प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करुन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पतित पावन संघटनेने यावेळी केली.
याबाबतचे निवेदन महापौर मुक्ता टिळक यांना देण्यात आले. त्यावर आठवडाभरात ठोस उपाययोजना करून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले. तसेच पालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने अनेकांना त्या मिळत नाहीत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे त्या परिसरात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात भटकत असतात. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावर आठवडाभरात शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर आयुक्तांच्या कार्यालयात 25 भटकी कुत्री सोडून यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.-