पुणे :- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांना मंजूरी देण्यात येते. ही विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा वार्षिक योजना 2019-20 च्या प्रारुप आराखडयाची छाननी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चालू आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला आमदार राहूल कुल, सदस्य शरद बुट्टे पाटील, ज्ञानेश्वर चवरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी उत्तम चव्हाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी 2018-19 या वर्षात जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विविध विकास कामांची सद्यस्थिती आणि त्यावर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. बैठकीत 2019-20 साठी प्रशासकीय विभागांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या सूचना, नवीन अंतर्भूत करण्यात आलेल्या योजना, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीतून झालेला खर्च व अखर्चित निधी, नवीन बाबींवरील प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. समिती सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी विकास कामांच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या सूचनांची दखल घेण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत केली.
जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रास्ताविकात 2019-20 साठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप आराखडयाची माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.