पुणे-महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सेवेत कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्यांना हलक्या स्वरूपाची कामे देणे आवश्यक असताना त्याना निलंबन करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या विरोधात आज मुख्यसभेत सर्वपक्षीय सभासदांनी आक्षेप नोंदवला. नंतर हा निर्णय मागे घेण्याचे आदेश आम्ही संचालक असलेले चौघेही लेखी पत्रानाव्ये तुकाराम मुंडे यांना देवू असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितल्या नंतर पीएमपीएमएल च्या विषयावर मुख्य सभेत पडदा पडला .
पीएमपीएमएलच्या सेवेत कर्तव्य बजावत असताना अनेक कर्मचार्यांना अपंगत्व आलेले आहे. या कर्मचाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे कामे करता येत नाहीत. त्यांना बैठ्या स्वरूपाची, हलकी कामे देणे आवश्यक असताना अशा कर्मचार्यांना पूर्वीप्रमाणेच कामे करा, अन्यथा निलंबित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले असून तसे आदेश काढण्यात आले आहे
या बाबत आज मुख्य सभेत सर्वपक्षीय सभासदांनी तीव्र आक्षेप नोंदवले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. याबाबत सभासदांनी सांगितले की, अपंग कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पीएमपीएमएलने कामावरून काढून टाकले तर कुटुंब कसे चालवावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. आणि चालकाला सेवेत असताना अपंगत्व आले असेल तर त्यांना वाहक आणि चालकाचे काम करता येणार नाही. पीएमपीएमएलने अशा कर्मचार्यांवर बैठी आणि हलक्या स्वरूपाची कामे द्यावीत. त्यांना निलंबित करू नये.
या बाबत पीएमपी कडून खुलासा करण्यात आला की, एखाद्या कर्मचाऱ्यांला अपघात झाल्यानंतर पाहिले तीन महिने त्याला 75 टक्के वेतन दिले जाते. त्या नंतर पुढील तीन महिने 50 टक्के, तर त्यानंतर तीन महिन्यासाठी 30 टक्के वेतन देण्यात येते. मात्र त्यानंतर कर्मचारी सेवेवर रुजू होणे शक्य नसल्यास त्याला सेवानिवृत्त करण्यात येते अशा प्रकारचा शासनाचा नियम असून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
या वर महापौरांनी पीएमपी प्रशासनाला हा निर्णय मागे घेऊन कर्मचाऱ्यांना पुन्हा कामात रुजू करून घेण्याचे आदेश दिले.