महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त पाच हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची ‘अभिवादन मिरवणूक’!
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे पाच हजार अल्पसंख्याक विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. ‘एम.सी.ई सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी मिरवणुकीचे उद्घाटन केले. तसेच मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले. अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे 16 वे वर्ष होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार व मार्गदर्शक तत्वांचे संदेश देणारे फलक, ‘पढो और पढाओ’, ‘नही छोडेंगे, नही छोडेंगे, शिक्षा का दामन नही छोडेंगे’, ‘मुलींनी शिकले पाहिजे’, ‘शेतकर्यांवर अन्याय होता काम नये’ या आणि अशा अनेक प्रेरक घोषणांचे फलक विद्यार्थ्यांनी हाती धरले होते. दरबार ब्रान्झ बॅण्ड, ढोल-ताशा पथक, सनई चौघडा मिरवणुकीत सहभागी झाले होते. तसेच मिरवणुकीमध्ये संस्थेच्या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘१८५१ साली महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले व त्यांच्या सहशिक्षीका फातिमा बी शेख यांनी भिडे वाडा येथे हिंदुस्थानची पहिली मुलींची शाळा स्थापन केली’ या विषयावरील देखावा सादर केला होता.
आझम कॅम्पस येथून सकाळी साडे आठ वाजता या मिरवणुकीस प्रारंभ झाला. पूना कॉलेज, गोल्डन ज्युब्ली, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक मार्गे विद्यार्थ्यांच्या प्रेरक घोषणांसह ही मिरवणूक महात्मा फुले स्मारक (समताभूमी) येथे पोहोचली. महात्मा फुले वाडा येथे संस्थेचे सचिव लतिफ मगदुम यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला.
प्रा. व्हि.एन.जगताप, डॉ. शैला बुटवाला, डॉ.भूषण पाटील, प्रा.गफार सय्यद, रबाब खान, प्रा.आएशा शेख, प्रा. शाहिन शेख, वाहिद बियाबानी, शाहीद इनामदार, खालिद अन्सारी, अरीफ सय्यद, मोहम्मद अनीफ शेख, सिकंदर पटेल, आझीम गुडाखूवाला, डॉ.एन.वाय.काझी, सर्व संस्थांमधील प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.