पुणे, – येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या विविध गृहपयोगी वस्तू विक्री केंद्राचे उदघाटन अभिनेते सयाजी शिंदे यांच्याहस्ते कारागृह महानिरिक्षक भूषणकुमार उपाध्याय, कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडले. येरवडा कारागृह प्रवेशद्वाराजवळ सुरु करण्यात आलेल्या या विक्री केंद्रामध्ये दिवाळी सणानिमित्त आकर्षक व मजबूत वस्तू विक्रीकरता ठेवण्यात आल्या आहेत. उच्च दर्जाच्या आणि किफायतशीर वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी मोठया प्रमाणावर या विक्री केंद्रास आणि प्रदर्शनास भेट दिली. दिवाळीनिमित्त आकाशकंदील, सतरंज्या, रेशमी साडया, बेड शीट, पिलो कव्हर्स, लाकडी फर्निचर, सजावटीचे सामान, खाद्यपदार्थ आदि वस्तू या केंद्रावर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तू नागरिकांनी खरेदी करुन सामाजिक जबाबदारी पार पाडावी अशी सूचना यावेळी सयाजी शिंदे यांनी केली.
यावेळी कारागृह महानिरिक्षक भूषणकुमार उपाध्याय, कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृह अधीक्षक यु.टी.पवार, कारागृह प्रशासतील अधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.