बरसणारी संततधार अन् कलेचा सुरेल संगम
तालायनच्या ‘ श्रध्दा सुमन ‘
मैफिलीतून रसिक चिंब
पुणे ता. २१: सभागृहात दर्दी रसिकांची गर्दी होती. स्वर, ताल व लयीच्या सुरेल साक्षीने मैफल बहरत होती. रसिकांची नेमक्या जागी लाभणारी उत्स्फूर्त दाद कलाकारांचा उत्साह वाढवत होती. बरसणारी संततधार अन् कलेचा सुरेल संगम अशा संस्मरणीय वातावरणात यंदाची ‘श्रद्धा सुमन’ मैफल रंगली.
तबला सम्राट पद्मविभूषण पंडित किशन महाराज यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध तबलावादक पंडित अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कलतर्फे ही मैफल घेण्यात आली. शकुंतला शेट्टी सभागृहात ही मैफल पार पडली.
या मैफिलीची सुरुवात युएसए येथील ख्यातनाम गायक मनू श्रीवास्तव यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी जैत श्री रागातील रचना व कलावती रागातील बंदिश पेश केली. दाणेदार आवाज, रागशुद्धता, समेवर येण्याची सहजता आणि टीपेला पोहोचणारा स्वर, आकर्षक ताना आणि चपळ तानक्रिया अशा वैशिष्ट्यपूर्ण स्वराविष्काराने त्यांनी रसिकांना मुग्ध केले.’ म्हारे घर आओ प्रीतम प्यारा,’ या मीरा भजनाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सांगता केली.
सुमधुर तालातून व विनम्र वाणीतून बनारस घराण्यातील विख्यात तबला वादक पंडित पुरण महाराज यांनी रसिकांची मने जिंकली. आपल्या प्रस्तुतीत त्यांनी पारंपारिक तीन तालातील विलंबित, अति विलंबित पेशकार, कायदा, रेला, गत, तुकडे, परण सफाईदारपणे सादर केले. चार मात्रांची चौहाई, चक्कधार तसेच बुजुर्ग कलाकारांच्या दुर्मिळ व ठेवणीतल्या रचना पेश करत त्यांनी रसिकांची विशेष वाहवा प्राप्त केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैलीचा वारसा पुढे नेणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर यांनी पंडित किशन महाराज यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शिवकामिनी ही देवीस्तुती सादर करत त्यांनी आपल्या प्रस्तुतीस प्रारंभ केला. नृत्य व अभिनयाचा सुरेख मिलाफ त्यांच्या सादरीकरणातून रसिकांनी अनुभवला. त्यांनी सादर केलेली सप्त ताल स्वरमालेतील वैशिष्टपूर्ण रचना रसिकांना विशेष भावली. तालाचे सौंदर्य दाखवणाऱ्या तिल्लानातून नेत्रसुखद नृत्याविष्काराचाचे त्यांनी उपस्थितांना दर्शन घडविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. पंडित अरविंदकुमार आझाद यांनी आभार मानले.