रोहनच्या लग्नाला फक्त १५ वऱ्हाडी किंवा चि.रोहन चिसौका स्नेहल आणि फक्त १५ वऱ्हाडी किंवा रोहनचे अनोखे शुभमंगल म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर लग्न कसं हजारभर निमंत्रितांच्या उपस्थितीत दणक्यात व्हायला हवं…त्यात वेडिंग डेस्टिनेशन किंवा विमानात नाहीतर थेट स्कूबा डायव्हिंगच्या थाटात केलं तर भन्नाटच. डिझायनर ड्रेस आणि थीम मॅरेज असेल क्या बात है. तीन चार प्रादेशिक मेन्यूची लज्जतही हवीच. सध्या लग्न म्हटलं असे संवाद हमखास कानावर पडतात. त्यात नवरानवरी सेलिब्रीटी असतील लग्न हा इव्हेंटच असतो. पण लव्ह लग्न लोचा मालिकेत राजाच्या भूमिकेतून आपल्या सर्वांना माहिती असलेला रोहन गुजर आणि त्याची मैत्रीण स्नेहल देशमुख यांनी मात्र हटके लग्न केलं आहे. साईबाबांचं मंदिर, भटजीबुवा, दोघांचे आईबाबा, सख्खी भावंडं अशा फक्त १५ वऱ्हाडींच्या साक्षीने रोहन आणि स्नेहल यांनी सहजीवनाच्या प्रवासाला सुरूवात केली. होणार सून मी या घरची, बन मस्का आणि आता लव्ह लग्न लोचा या मालिकेत रोहन गुजर याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण याच रोहनने १५ वर्षापूर्वी मैत्रीण स्नेहल हिचे मन जिंकले. दीड दशकाच्या खास मैत्रीनंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. पण रोहनला डामडौल करत लग्न करायचं नव्हतं. रोहन सांगतो, मी हा निर्णय स्नेहलला सांगितला आणि तिलाही तो पटला. मग आमच्या कुटुंबीयांना या निर्णयाबाबत सांगितले. सुरूवातीला त्यांच्याकडून नाराजीचा सूर उमटला, पण आमच्या निर्णयाला त्यांनी अखेर पाठिंबा दिला. लग्नातला खर्च टाळण्यासाठी नव्हे तर लग्नासारखा आपल्या आयुष्यातील खास सोहळा कुटुंबीयांच्या सानिध्यात व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचेही रोहन सांगतो. शिवाय लग्नात खूप मंडळी आली तरी त्यांना आपल्याला नीट वेळही देता येत नाही. अर्थात अभिनेता रोहन आणि झी वाहिनीसाठी डिजिटल हेड म्हणून काम करणाऱ्या स्नेहलचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यामुळे लग्नाला न बोलवल्याबद्दल मित्रमैत्रीणींकडून ओरडूनही घ्यावे लागले. पण रोहनचा फंडा ऐकून आता त्याच्या काही मित्रांनी अशाच प्रकारे लग्न करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. सकाळी मंदिरात लग्न झाल्यानंतर गुजर आणि देशमुख फॅमिलीने एका हॉटेलमध्ये मस्त एकत्र जेवण केलं आणि दुपारी ही मंडळी रोहनच्या घरीही आली. इतकेच नव्हे तर लग्नानंतर तीनचार दिवसात रोहन लव्हलग्नलोचा मालिकेच्या शूटसाठी हजरही होता.