जागतिक कौशल्य दिनानिमित्त ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने अभियांत्रिकी व हस्तकौशल्य वस्तूंचे प्रदर्शन संपन्न.
पुणे : कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील नाविन्याची व सृजनात्मकतेची वाढ होते. हजारो युवकांच्या हाताला काम देण्याचे सामर्थ्य कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये आहे. अनेकविध प्रकारच्या कौशल्य अभ्यासक्रमांमुळे युवकांना उद्योजकतेची संधी उपलब्ध होत आहे, असं मत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्राचे पुणे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी व्यक्त केले.
जागतिक कौशल्य दिनानिमित्त ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अभियांत्रिकी व हस्तकौशल्य वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अभियांत्रिकी व हस्तकौशल्याच्या वस्तू या खरोखर समाजाला उपयुक्त अशा असून या वस्तूंचा व्यावसायिक वापर केल्यास त्यातून नक्कीच उद्योजकतेची संधी निर्माण होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला. तसेच संस्थेनेही या प्रकल्प वस्तुंच्या निर्मितीचे पेटंट मिळ्वण्याबाबतही प्रयत्न करावेत असे सांगितले.
या अभियांत्रिकी व हस्तकौशल्य वस्तूंच्या प्रदर्शनात यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शिका व कमवा योजनेतील विद्यार्थी, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातील विद्यार्थी व कौशल्य सेतू अभियानातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा सहभाग होता.
यामध्ये सोलर ऑपरेटेड एअर कुलर, इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग स्पीड ब्रेकर, ऑटोमॅटिक फर्टीलायझर स्प्रेडींग मशीन, सोलर ट्रेन या व अशा एकूण २२ प्रकल्प वस्तूंचा समावेश होता.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रदर्शनात औरंगाबाद जिल्ह्यातून आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक हायड्रॉलिक लिफ्ट, मोबाईलमधील वायफाय कनेक्शनवर चालणारे रॉड रोलर मॉडेल व सोलार कार या प्रकल्प वस्तू मांडण्यात आल्या होत्या.
याप्रसंगी उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे रजिस्टार डॉ. विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राम सोमण यांनी केले.
या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रा. सुनीता पाटील, प्रा. स्वाती पाटील, गंगाधर डुकरे, निखिल चव्हाण, बापूराव आटपाडकर, सतीश माळी, अश्विनी लांडगे, पवन शर्मा, भारती भालेराव, संगीता म्हात्रे, शाम वायचळ, प्रथमेश पाटील, श्रीकांत तिकोने, सचिन कुंभारकर आदींनी सहकार्य केले.


