पुणे- दोन दिवसांच्या मुक्कामानंतर निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी आज सकाळी मार्गस्थ झाली ,सकाळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने संत ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी स्वागताकरीता पुलगेट येथे स्वागत कक्ष उभारुन दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीतील वारकरी बांधवाना फराळांचे पाकीट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. दोन्ही पालख्यांचे आदरतिथ्य झाल्यानंतर दोन्ही पालख्या पुढे रवाना झाल्या.

नंतर पालखीचे हडपसरवासीयांनी उत्साहात स्वागत केले. विसावास्थळी रांगोळ्याच्या पायघड्या व फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. दुतर्फा गर्दी करून पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांना फराळ, अन्नदान करण्यात आले. विसावा घेतल्यानंतर माउलींची पालखी सासवड रस्त्याने ; तर तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर मुक्कामी मार्गस्थ झाली.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास; तर संत तुकाराम महाराजांची पालखीपावणेबाराच्या सुमारास हडपसरमध्ये पोचली. विसावा घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास; तर तुकाराम महाराजांची पालखी दुपारी दीडच्या सुमारास मार्गस्थ झाली. स्वागतासाठी महापौर मुक्ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, संजय घुले, उज्वला जंगले, बंडू गायकवाड, हेमलता मगर, नाना भानगिरे उपस्थित होते. गाडीतळ येथे पादुकांची पूजा झाल्यानंतर लाखो भक्तांनी दर्शनबारीमध्ये उभे राहून शांततेत दर्शन घेतले.

