पुणे : ‘पुणे -कोल्हापूर मार्गावरील रेल्वेतील प्रवासी त्यांच्या इच्छुक स्थळी सुरक्षितपणे पोहोचविणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. याकरिता गाड्या वेळेवर आणि सुरक्षितपणे धावतील यासाठी लोको ऑपरेशन विभाग आणि इंजिनचालक वर्ग यांना काही कर्तव्ये पार पाडावी लागतात. रेल्वेच्या ‘लोकोमोटिव्ह ऑपरेशन’ विभागाकडून इंजिनचालकची बदलणारी ड्युटी यावर नियंत्रण असते. या सर्व सुरक्षितेत जेथे लोको पायलट दोन गाड्यांच्या वेळेमध्ये विश्रांती घेतात अशी ‘रनिंग रूम’ आणि जेथून लोको पायलट आपल्या पुढील गाडीच्या प्रवासासाठी सही करून निघतो ती ‘क्रू बुकिंग लॉबी’ सुरक्षित ठेवण्याचे काम जबाबदारीचे असते. प्रवाशांच्या सुरक्षिततेकरीता ‘रनिंग रूम’ आणि ‘क्रू बुकिंग लॉबी’ सारखे उपक्रम निश्चित उपयोगी ठरणार आहेत, असे मत मध्य रेल्वेचे महासंचालक यांनी व्यक्त केले.
निमित्त होते मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत वार्षिक अधिकृत तपासणी (इन्स्पेक्शन) चे. ही तपासणी (दिनांक 6 फेब्रुवारी रोजी) सातारा रेल्वे स्टेशन येथे झाली. यावेळी एस. पी. वावरे (मुख्य विद्युत अभियंता), रेणू शर्मा (विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग), जोएल मॅकेन्झी (डीएमई, लोको ऑपरेशन विभागप्रमुख, मध्य रेल्वे पुणे विभाग), अरुण कुमार (रनिंग रूम प्रमुख, सातारा स्टेशन), नितीन खोपडे (मुख्य निरीक्षक, लोको पायलट विभाग, मध्य रेल्वे पुणे), इतर विभागप्रमुख, पदाधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या प्रसंगी ‘रनिंग रूम’ मधील महिला लोको पायलट रूम, आणि लोको पायलटच्या प्रशिक्षणासाठी पुणे विभागाने विकसित केलेल्या व्हिडीओचे उद्घाटन झाले.
‘अशा रनिंग रूम लोको पायलट आणि प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित प्रवासासाठी उपयुक्त आहेत. याकरिता लोको ऑपरेशन टीमचे विशेष कौतुक, असे देखील मित्तल म्हणाले.
रनिंग रूम लोको पायलटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयुक्त
——————————————————————-
लोको पायलट यांची ड्युटी साधारणपणे 9 तास इतकी असते. त्यांनतर पुढील ड्युटीमधील वेळ कमीतकमी 8 तास विश्रांती घेणे लोको पायलटसाठी बंधनकारक असते. या सर्व बाबी अभ्यासात घेता त्यांच्या विश्रांतीची जागा म्हणजे रनिंग रूम यातील सुविधा महत्वाच्या असतात. याकरिता सातारा रेल्वे स्टेशन रनिंग रूम वातानुकूलित असून, तेथे वैयक्तिक लॉकर, आरोग्याच्या दृष्टीने योग्य घरगुती जेवण सुविधा, व्यायामाची उपकरणे असलेली जिम सुविधा, ‘मेडिटेशन रूम’, सोलर सुविधा, बगीचा अशा विविध सुविधांचा समावेश आहे. महिला आणि पुरुष लोको पायलट यांच्यासाठी स्वतंत्र रनिंग रूम आहेत.‘ई एन फिल्म्स’च्या वतीने सुरक्षित रेल्वे प्रवास या दृष्टीकोनातून महत्वाची असलेली ‘रनिंग रूम’ आणि ‘क्रू लॉबी’ यावर लक्षकेंद्रित करणार्या जनहितार्थ माहितीपटाची निर्मिती केली आहे. 5 मिनिटांच्या या माहितीपटात मध्य रेल्वे पुणे विभागातील रनिंग रूम्समध्ये देण्यात आलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय सूत्रांनी दिली.