पुणे : पत्रकारितेत देशाच्या व्यापक हितात सहभागी करणारी संवेदनशीलता येऊन त्यात परिवर्तनाकडे नेणारी सकारात्मकता यायला हवी. हे ज्या पत्रकारितेत होणार नाही, त्या पत्रकारितेला जनताही स्वीकारणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व ज्येष्ठ पत्रकार राम माधव यांनी केले.
विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंतीनिमित्त देवर्षी नारद गौरव पत्रकारिता पुरस्कार माधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार दिलीप धारूरकर, युवा पत्रकार मुस्तफा आतार, छायाचित्रकार गणेश कोरे आणि प्रथमच सोशल मीडिया पुरस्कार शेफाली वैद्य यांचा समावेश होता. रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विश्व संवाद पुणे केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रवींद्रसिंह परदेशी यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात वकील असणार्या लोकमान्य टिळकांनीही पत्रकारितेचा वापर हा देशाचे स्वातंत्र्य मिळावे या ध्येयाने केला होता, असे सांगून माधव म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर पत्रकारिता व वृत्तपत्रे ही केवळ व्यवसाय बनली नसून त्याला आता एका व्यापाराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे पत्रकारितेला आज पुन्हा एका उदात्त ध्येयाकडे नेणे गरजजे आहे. नारद हा पत्रकारितेचा जनक समजला जात असून त्याच्या विचारसरणीनुसार पत्रकारितेतील अहंकार जाऊन तिथे मानवतावादी दृष्टीकोन व दिलेल्या बातमीचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. कारण सुशिक्षित व सर्वश्रूत बनलेल्या आजच्या समाजाला खरे व खोटे यातला फरक लगेच समजतो. तसेच पत्रकारितेतील डाव्या व उजव्या विचारांचा पत्रकार हा भेदभावही संपायला हवा.
पारंपरिक पत्रकारितेच्या सीमा आता पुसल्या जात असून नवीन मीडिया म्हणून सोशल मीडियावर आता प्रत्येक व्यक्तीच पत्रकार म्हणून काम करू शकते. अशा स्थितीत मु‘य प्रवाहाशी जोडल्या गेलेल्या पत्रकारितेबरोबरच सोशल मीडियावर माहिती देणार्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यातून खोटा प्रचार टाळून वस्तूनिष्ठपणे बातम्या व माहिती सांगितली पाहिजे. पत्रकारितेतही बातम्या हव्यात, कुणाची वैयक्तीक मते नकोत किंवा वास्तूस्थितीची मोडतोडही केली जाता कामा नये, अशी अपेक्षा माधव यांनी व्यक्त केली.
विश्व संवाद केंदाची स्थापना ही राष्ट्रीय विचारांशी जोडल्या गेलेल्या विचारसरणीच्या लोकामंध्येम प्रसिद्धीमाध्यमांसंबंधीच्या साक्षरतेसाठीच झाला असून पुरस्कार देण्याचे हे सहावे वर्ष आहे, असे कुलकर्णी म्हणाले. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणार्यांमधले तिघे पत्रकार होते. तसेच आई-वडील, शिक्षक यांच्यानंतर प्रसिद्धी माध्यमेच तरुणांवर प्रभाव टाक असल्यामुळे आमच्या संस्थेचा पत्रकारितेशी खूप जवळचा संबंध आहे, असे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.
पुरस्कारार्थी आतार, कोरे, धारुरकर आणि वैद्य यांनी पत्रकार बनण्यातील आपली जडणघडण उलगडताना व प्रेरणा देणार्या सुहृदांचे आभार मानले. दीपा भंडारे यांनी या कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले होते, तर डॉ. परदेशी यांनी आभार मानले.



