सातारा मेगा फूड पार्क आणि पुण्यातल्या राष्ट्रीय जल अकादमीला भेट देऊन तिथल्या कामांचा घेतला आढावा
पुणे 24 डिसेंबर 2021
केंद्रीय जलशक्ती आणि खाद्यान्न प्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पटेल यांनी सातारा मेगा फूड पार्कला भेट देऊन तिथल्या कामाची पाहणी केली. हे फूडपार्क अद्याप पूर्ण क्षमतेनं सुरु झालेलं नाही. यात निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन पटेल यांनी यावेळी दिले. शीतगृहाच्या सुविधा या फूडपार्कमध्ये उपलब्ध कराव्यात, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री पटेल यांनी सातारा तालुक्यातील अपशिंगे आणि खंडाळा तालुक्यातील गुटळवाडी या दोन गावांना देखील भेट दिली आणि ग्रामीण भागातील घरांना पिण्याच्या पाण्याचा सुरक्षित आणि पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने हाती घेतलेल्या जल जीवन अभियानामधून त्या गावांमध्ये सुरु असलेल्या कामांचे परीक्षण केले. गुटळवाडी गावात गावकऱ्यांनी सुरु केलेल्या कचरा पुनर्वापर प्रक्रियेचे देखील केंद्रीय मंत्र्यांनी कौतुक केले.
तत्पूर्वी काल पटेल यांनी पुण्यातल्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय जल अकादमीला भेट दिली. या भेटीत त्यांनी तिथल्या कामाचा आढावा घेतला. पाण्याच्या समस्येवर मंत्रालय काम करत असून खाद्यान्न प्रक्रिया उद्योगात गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पटेल यांनी दिली.
केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. केंद्र सरकारने जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनसाठी राज्य सरकारला भरीव अनुदान दिले असून राज्य आणि केंद्राच्या शासकीय संस्थांनी या योजना ग्रामीण भागातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, असे मत प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केले. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्या तरच सशक्त भारत घडण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रल्हाद सिंह पटेल यांनी जल अकादमीच्या आवारात वृक्षारोपणही केलं. तसेच दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी जाऊन श्रध्दांजली अर्पण केली.
मेगाफूडपार्कयोजनेविषयी
पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्यात प्रामुख्याने नाशिवंत मालावर विशेष लक्ष केंद्रित करत अन्नाची नासाडी कमी करत आणि मूल्यवर्धन करत अन्न प्रक्रिया क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, देशात मेगा फूड पार्क योजनेची अंमलबजावणी करत आहे. त्याच बरोबर क्लस्टर आधारित दृष्टीकोनाद्वारे बाजारपेठेपर्यंत मुल्य साखळीसह मेगा फूड पार्क अन्न प्रक्रियेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. या योजने अंतर्गत भारत सरकार एका मेगा फूड पार्क प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयांचे वितीय सहाय्य पुरवते
सातारामेगाफूडपार्कविषयी
सातारा मेगा फूड पार्क 64 एकर जागेवर 139.30 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे. या मेगा फूड पार्कच्या मध्यवर्ती प्रक्रिया केंद्रात विकासक ज्या सुविधा तयार करत आहेत, त्यात 5000 मेट्रिक टन कच्चा माल साठविण्यासाठी सुक्या मालाची साठवणूक करण्ये गोदाम, 2000 मेट्रिक टन माल साठविण्यासाठी रॅक्स असलेले गोदाम, तासाला 2 टन क्षमतेची पल्प लाईन, 3000 मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे शीत गृह, 384 मेट्रिक टन क्षमतेचे पिकवणी कक्ष, तासाला 1 टन क्षमतेचे भाज्या आणि फळांचे पॅक हाऊस आणि इतर अन्न प्रक्रिया सुविधा यांचा समावेश आहे. सातारा मेगा फूड पार्क केवळ सातारा जिल्ह्यातल्या लोकांनाच लाभदायक असणार नाही, तर पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातल्या लोकांसाठीही उपयुक्त ठरेल.
केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय जल अकादमी :
पुणे येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र हे भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील जल स्रोत विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या जलशक्ती आणि संबंधित संशोधनाच्या क्षेत्रातील मुख्य संशोधनविषयक संस्था आहे. नद्या, तटवर्ती भाग, जल साठे यांच्या संरचना तसेच जलशक्ती रचनेची वाहतूक अधिकाधिक प्रमाणात करण्यासाठी विशिष्ट संशोधन आणि विकासात्मक अभ्यासविषयक नियोजन, आयोजन आणि असा अभ्यास हाती घेण्याबाबत ही संस्था कार्य करते.
भारत सरकारने जल स्त्रोतांच्या विकास आणि व्यवस्थापनामध्ये गुंतलेल्या विविध केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांच्या सेवेत असलेल्या अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सन 1988 मध्ये राष्ट्रीय जल अकादमीची स्थापना केली. जल संसाधन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय जल अकादमी, “उत्कृष्टता केंद्र” म्हणून काम करेल अशी परिकल्पना करण्यात आली आहे.