पुणे-चैतन्यशील व तरुण बिझनेस आयकॉन, तसेच किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक मानसी किर्लोस्कर यांचे नुकतेच ‘बिट्स पिलानी अपोगी २०१८’ कार्यक्रमात प्रेरणादायी व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या विशेष पाहुण्या या नात्याने त्यांनी ‘नव्या युगातील नवउद्योग परिसंस्था’ (न्यू एज स्टार्टअप्स इकोसिस्टिम) या संकल्पनेवर बीजभाषण सत्रात आपले विचार व्यक्त केले. ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स’च्या (बिट्स पिलानी) विद्यार्थ्यांबरोबरच भारत व जगभरातील अनेक बुद्धिमंत या कार्य़क्रमात सहभागी झाले होते.
मानसी किर्लोस्कर म्हणाल्या, “आज अनेक नवउद्योगांनी अजोड आणि अकल्पित असे यश मिळवून दाखवले आहे. नवउद्योग व त्यांचे तरुण संस्थापक दाखवत असलेली अभिनवता व नवनिर्मिती प्रत्येक उद्योगाला स्पर्धात्मक राहण्यासाठी सुसंगतच असते. भारताला प्रचंड बाजारपेठ, उद्योजकीय मानसिकता आणि नवउद्योग सुरु करणाऱ्यांत झपाट्याने होत असलेली वाढ या गोष्टींमुळे प्रचंड सुप्त सामर्थ्यवान नवउद्योग निर्माण करण्याचे लाभ आहेत. याचा परिणाम म्हणून भारत आज चीन व अमेरिकेपाठोपाठ जगाची तिसरी सर्वांत मोठी नवउद्योग परिसंस्था म्हणून उदयाला आला आहे.” मालमत्ता, सेवा व नैपुण्य या क्षेत्रांत नवनिर्मिती घडवून नवउद्योग भारतात थक्क करणारी कामगिरी करुन दाखवत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
या बीजभाषण सत्रानंतर मानसी किर्लोस्कर यांनी बिट्स पिलानी कॅम्पसमधील ‘इन्स्पायर्ड कार्टेर्स’ या संघाला भेट दिली. ‘इन्स्पायर्ड कार्टेर्स’ ही बिट्स पिलानीची फॉर्म्युला स्टुंडट टीम सध्या स्वतःच्या कल्पनेतील कारच्या पाचव्या आवृत्तीची रचना करत आहे. मानसी किर्लोस्कर यांनी या संघातील विद्यार्थ्यांनी विकसित व प्रदर्शित केलेल्या वाहनांची माहिती घेतली. मोटरस्पोर्ट्स क्रीडाप्रकारावरील निखळ प्रेमातून चालकाच्या गरजांचा अभ्यास करुन निश्चित नियमांच्या आधारे ओपन व्हील ओपन कॉकपिट फॉर्म्युला टाईप रेसकार विकसित करण्याच्या आपल्या संघांच्या मोहिमेबाबत विद्यार्थ्यांनी मानसी किर्लोस्कर यांना माहिती दिली. आकांक्षेतून उत्तम वाहन तयार करण्याचे विद्यार्थ्यांचे प्रयत्न त्यांच्याकडूनच जाणून घेणे अत्यंत रंजक असल्याचे मानसी किर्लोस्कर यांनी नमूद केले.