पुणे-एक प्रमुख हाय अल्टिट्यूड ट्रेकिंग अँड माउंटेनिअरिंग कंपनी असलेल्या ॲडव्हेंचर पल्सने भारतीयांच्या सर्वांत मोठ्या जथ्याला आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट किलिमांजारोवर नेण्याच्या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व करुन नुकताच इतिहास घडवला.
किलिमांजारोसारख्या पर्वतावर यशस्वी चढाई करण्याचे सरासरी प्रमाण एरवी ५० टक्क्यांहून अधिक असत नाही, मात्र ॲडव्हेंचर-पल्सच्या गटातील १८ आरोहकांपैकी १७ जणांनी जगातील सर्वांत उंच खड्या पर्वताचे शिखर यशस्वी गाठून यशस्वितेचे प्रमाण तब्बल ९५ टक्के दाखवून दिले आहे. एक आठवडाभर सुरु असलेली ही मोहीम गेल्या १ फेब्रुवारीला स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊला फत्ते झाली. गटातील केवळ एका गिर्यारोहकाला शिखर चढाई मोहीम सुरु होण्याआधीच परत यावे लागले.
यासंदर्भात बोलताना मोहिमेचे नेते समीर पाथम म्हणाले, “ही थक्क करणारी कामगिरी आहे. माऊंट किलिमांजारो पर्वत समुद्र सपाटीपासून १९,३४० फूट उंचावर असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो जगातील सर्वांत उंच खडा पर्वत आहे, जगातील सर्वोच्च सात शिखरांच्या मालिकेत (प्रत्येक खंडांतील सर्वांत उंच शिखरे) त्याचा समावेश आहे आणि ते आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे.”
ॲडव्हेंचर-पल्सच्या १८ जणांच्या गिर्यारोहक संघाने गेल्या २५ जानेवारीला ही मोहीम सुरु केली. या संघात समाजाच्या सर्व स्तरांतील नियमित पदभ्रमण करणाऱ्यांचा समावेश होता. यामध्ये चक्क आर्य भाटिया हा दहा वर्षांचा मुलगाही सहभागी होता. (त्याच्यासमवेत त्याची आई पवन सोही होती.) हा मुलगा किलिमांजारो शिखर सर करणारा सर्वांत तरुण भारतीय अमेरिकन ठरला आहे.
संघातील इतर सदस्यात कॅलिफोर्नियातील डब्लिनची रेना, बंगळुरुच्या वासवदत्ता व मेघा, नाशिकची अनुराधा, मुंबईचे ॲशडिन, पूर्वा, सपना व प्रशांत, पुण्यातून पूजा कपूर, प्रतिमा कोरे, इप्सा, कनिष्क पांडे व हितांशु मलानी (दोघेही इयत्ता बारावीचे विद्यार्थी), सलिल करिश्मा व मोहीम नेते समीर पाथम यांचा समावेश होता.
या पदभ्रमणाच्या अनुभवाबाबत विचारले असताना प्रतिमा कोरे म्हणाली, “जगातील सर्वांत उंच खड्या पर्वताच्या व आफ्रिका खंडातील सर्वांत उंच शिखरावर चढाई करण्याची अनुभूती शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मागे वळून पाहाताना ‘मला ते करायची इच्छा होती’, असे म्हणण्यापेक्षा ‘मी ते केलंय यावर विश्वासच बसत नाही’, असे म्हणणे नेहमीच आनंदाचे असते. या मोहिमेपेक्षा मी या प्रवासाची स्मृती नेहमी जपून ठेवेन. माझी बहीण प्रणोती, गिरीभ्रमणप्रेमी पूजा आणि मोहिमेचे नेते समीर पाथम यांना खूप खूप धन्यवाद. समीर यांनी आफ्रिकेतील किलिमांजारोप्रमाणेच रशियातील एल्ब्रुस, नेपाळमधील एव्हरेस्ट अशा शिखरांवर अनेक मोहिमा यशस्वी नेल्या आहेत. अतिउंचावरील चढायांच्या कलेत ॲडव्हेंचर-पल्सने प्रभुत्व मिळवले असून त्यांना प्रत्येक आरोहकातील चैतन्याचा मोहीम यशस्वी करण्यासाठी कसा उपयोग करुन घ्यायचा, हे अचूक ठाऊक आहे.”
रेना हिनेही हर्षोल्हासित प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली, होय. मी अखेर ते शिखर गाठले आहे. ॲडव्हेंचर-पल्सच्या संपूर्ण संघाच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली ही कामगिरी शक्य झाली नसती. त्यांनी मला नुसती चढाई करण्याची घाई केली नाही, तर आजूबाजूच्या रम्य आणि चित्तथरारक देखाव्यांची अनुभूती घेण्यासाठी हवा असलेला अवकाशही दिला. मी एक-एक पाऊल काळजीपूर्वक टाकत शिखरापर्यंत गेले, पण गरजेच्या क्षणी ॲडव्हेंचर-पल्सचा संघ तेथे सज्ज होता. मला त्या खडकांवरुन वर ओढून घेण्याची गरज होती आणि या संघाने मला मदतीचा हात देत शिखर सर करण्याचा आनंद मिळवून दिला. या संपूर्ण संघाची मी अत्यंत आभारी आहे.”
ॲडव्हेंचर-पल्सने नोव्हेंबर २०१६ मध्ये महाराष्ट्रातील सर्वांत तरुण पदभ्रमणपटूला नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्पला नेऊन, तसेच काही वर्षांपूर्वी पुण्याच्या बिशप स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांत मोठ्या जथ्यालाही एव्हरेस्ट बेस कॅम्पला नेऊन विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे.
लिमांजारो मोहीम – २०१८ च्या यशामुळे उत्साहित होऊन आता ॲडव्हेंचर-पल्सने येत्या वसंत ऋतूमध्ये माऊंट एव्हरेस्ट मोहिमेचे पुढचे मोठे आव्हान स्वीकारले आहे.