लाहोर-वजीराबाद, गुजरांवाला येथे गुरुवारी इम्रान खान यांच्यावर लाँग मार्चमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप त्याची ओळख उघड केलेली नाही. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये त्याचे नाव फैझल, तर काहींमध्ये जावेद इक्बाल असे नमूद करण्यात आले आहे.
या हल्लेखोराच्या पोलीस कोठडीत दिलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ पाकिस्तानच्या अनेक वरिष्ठ पत्रकारांनी शेअर केला आहे. यामध्ये आरोपीने तो एकटाच हल्ला करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्याला इम्रान यांना ठार मारायचे होते, कारण खान यांच्या लाँग मार्चमध्ये अजानच्या वेळीही डेक (डीजे) वाजत होता. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
आरोपी पोलिस कोठडीत म्हणाला- मी हे (इम्रानवर गोळीबार) केले कारण इम्रान लोकांची दिशाभूल करत आहेत. ही बाब मला सहन झाली नाही आणि मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मी फक्त इम्रान खान यांना मारायला आलो होतो. मला त्यांना ठार मारायचे होते कारण इथे अजान व्हायची आणि खान तिथे डीजे लावायचे. हे मला पटत नव्हते.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी म्हणाला- मी हा निर्णय अचानक घेतला. यासाठी अगोदर कोणतेही नियोजन नव्हते. ज्या दिवशी हा लाँग मार्च लाहोरहून सुरू झाला, त्यादिवशी मी इम्रानला सोडणार नाही, असे ठरवले होते. माझ्या मागे कोणी नाही, हे काम मी एकट्याने केले आहे. मी बाइकने आलो होतो, ती माझ्या काकांच्या दुकानात उभी केली होती.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि आयबीही चौकशीसाठी या आरोपीपर्यंत पोहोचली आहे. वृत्तानुसार, आरोपीने एकट्याने ही घटना घडवली याची पोलिसांना खात्री नाही. याचे कारण पंजाब प्रांतात इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार असून इम्रान यांना जबरदस्त सुरक्षा कवच देण्यात आले आहे. याशिवाय खान यांचे वैयक्तिक सशस्त्र सुरक्षा रक्षकही तेथे आहेत.
पोलिसांसमोर प्रश्न आहे की आरोपीचा दुसरा कोणी साथीदार असेल तर तो कुठे आहे? याचे कारण म्हणजे एएफपी या वृत्तसंस्थेसह काही पत्रकारही हल्लेखोर जागीच ठार झाल्याचे सांगत आहेत. इम्रान यांच्या पक्षाचे नेते अमीन अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारला गेलेला व्यक्ती पीटीआयचा कार्यकर्ता होता.
लष्कर हस्तक्षेप करण्याची शक्यता
- इम्रान खान यांना सत्तेच्या शिखरावर नेण्यात बलाढ्य लष्कर आणि आयएसआयचा हात होता. प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्यावर दोघांनीही साथ देणे बंद केले. यानंतर वर्षाच्या सुरुवातीला खान यांचे सरकार पडले आणि ते आता लष्कर आणि आयएसआयला खुले आव्हान देत आहेत.
- वास्तविक, इम्रान यांना लष्कराने पुन्हा पाठिंबा देऊन सत्तेवर आणावे असे वाटते. दुसरीकडे, लष्कर आणि गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे की, त्यांनी स्वतःला राजकारणापासून कायमचे दूर केले आहे.
- सध्याचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. जनरल बाजवा यांच्या जागी आयएसआयचे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांना लष्करप्रमुख बनवावे, अशी इम्रान यांची इच्छा आहे. फैज हे इम्रान यांचे खूप जवळचे मित्र आहेत. या कारणास्तव जनरल बाजवा यांनी त्यांना आयएसआय प्रमुख पदावरून हटवले आणि नियमांचा हवाला देत पेशावरचे कॉर्प्स कमांडर बनवले.
- सध्या आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम आहेत. ते अत्यंत कठोर वृत्तीचे आणि माध्यमांपासून दूर राहणारे अधिकारी असल्याचे बोलले जाते. 10 दिवसांपूर्वीच नदीम यांना इम्रान यांच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.