पुणेः- आयुष्याच्या प्रवासाच्या विविध टप्प्यांवर शांताबाई आपल्याला गाण्यांच्या रूपाने भेटत असतात. ससा तो ससा पासून शूर आम्ही सरदार आम्हाला, काय बाई सांगू, तोच चंद्रमा नभात अशी प्रतिभेची अनेक रूपे त्यांच्या गीतांमधून अनुभवायला मिळतात.त्यामुळेच शांता शेळके म्हणजे चिरतरूण प्रतिभेचे मूर्तीमंत उदाहरण आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये आज आम्ही कोथरूडकर, संवाद पुणे आणि पूना गेस्ट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने शांताबाई शेळके साहित्यसेवा पुरस्कार प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, आम्ही कोथरूडकरचे ॲड. मंदार जोशी आणि पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंगला गोडबोले म्हणाल्या की, सर्वसाधारणपणे आम्ही ग्रामीण भागात असल्याने आम्हाला योग्य वेळी योग्य व्यासपीठ न मिळाल्याची कलाकारांची तक्रार असते. परंतु, शांताबाई अशा कलाकारांसमोर एक आदर्श उदाहरण ठरू शकतील, कारण त्या स्वतः इंदापूरसारख्या छोट्या खेड्यातून आल्या आणि वडिलांच्या वन विभागातील नोकरीमुळे ठिकठिकाणी फिरत्या राहिल्या. जे क्षेत्र महिलांना वर्ज्य मानले जात होते, अशा चित्रपट सृष्टीत देखील शांताबाईंनी भालजींच्या मदतीने पाय रोवले. एवढेच नव्हे तर त्यांच्या गीताला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. जो आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यांवर रसिकांची साथ करतो, तो श्रेष्ठ कलाकार असतो. शांताबाईंना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, या सगळ्या अडचणींना त्या सकारात्मकतेने सामोऱ्या गेल्या. बाहेर कितीही वादळे आली, तरी आयुष्याचा झुळझुळता प्रवाह सुरू ठेवायचा अशा उत्तुंग मनोबलाचे उदाहरण त्या कलाकारांच्या पुढच्या पिढीसमोर ठेवून गेल्या. आजच्या कलाकारांनी देखील स्वतःच्या कलेबाबत आत्मविश्वास बाळगावा. शांताबाई म्हणजे शारदेचे मूर्तीमंत रूप होते. जन्मशताब्दी निमित्त त्यांचे जे स्मरण केले जात आहे, यापेक्षा वेगळी आदरांजली कुठली असणार. त्या साहित्याच्या गाढ्या अभ्यासक होत्या. पु.ल. देशपांडे त्यांना साहित्यातील रेडी रेकनर म्हणायचे. लेखकांना कधीही, कुठेही, काहीही अडले की त्या संदर्भाच्या दृष्टीने माहितीची खाण होत्या.
यावेळी बोलताना मनीषा निश्चल म्हणाल्या की, शांताबाई आणि मंगेशकर कुटुंबियांनी अफाट काम करून ठेवले आहे. पुढील पिढीपर्यंत हे काम पोहोचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या स्तरावर करते आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शब्द स्वरांचे सुरेल मैत्र हा कार्यक्रम सादर झाला. गायक अभिजीत वाडेकर आणि गायिका मनीषा निश्चल यांनी हा कार्यक्रम सादर केला.
तत्पूर्वी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात पूनम कुडाळकर यांचा लावणी महोत्सव झाला. यावेळी विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे आणि संयोजिका कांचन कुंबरे उपस्थित होत्या. कोथरूड विभागातील सर्व महिलांनी या लावणी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद देत, या महोत्सवाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. अॅड. मंदार जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. ऋचा थत्ते यांनी सूत्रसंचालन केले. किशोर सरपोतदार यांनी आभार मानले.