पुणे, दि. 28 मे : गेल्या सव्वा वर्षांहून अधिक काळ आपला देश व संपूर्ण विश्व कोरोना महामारीने त्रस्त आहे. पुणे शहराचा जिल्हाचा विचार केला तर, आपल्याकडे तीनवेळा लॉकडाऊन झाले. सुमारे सव्वा वर्षाच्या काळात पाच महिन्यांचा कालावधी या लॉकडाऊनमध्ये गेला. उर्वरीत काळातही दुकाने व व्यापार थोडाफार सुरु राहून देखील व्यवसाय झाला नाही. यामुळे व्यापार क्षेत्र सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. महाराष्ट्र व देशाला पुन्हा उभारी घ्यायची असेल तर, व्यापार क्षेत्राला ताकद देण्याची आवश्यकता आहे. राज्य व केंद्र सरकार व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्जाचे पूनर्गठन, कर्जफेडीसाठी एक वर्षानंतर हप्ता सुरू, शून्य टक्के व्याज दराने तीन वर्षांसाठी कर्ज इत्यादी माध्यमातून व्यापारी वर्गाला मदत करू शकते, असे मत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष व कैट महाराष्ट्र संघटनेचे सहसचिव सचिन निवंगुणे यांनी व्यक्त केले आहे.
व्यापारामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. साधारणपणे चारशे विविध प्रकारचा व्यापार व व्यवसाय आपल्याकडे होतो. देशाचा विचार केला तर, सुमारे 10 कोटी लोकसंख्या व्यापार करते. आणि या क्षेत्रातील रोजगार पकडता सुमारे 40 कोटी लोकसंख्या एकट्या व्यापार क्षेत्रावर अवलंबून आहे. पुण्यात सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांची संख्या सुमारे 5 लाख आहे. त्यावर अवलंबून असलेल्या संख्या 20 ते 22 लाख आहे. त्यामुळे कोरोना व लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ झटकून आर्थिक प्रगतीला चालना द्यायची असेल तर, व्यापार क्षेत्राला मदत देण्याची, ताकद देण्याची नित्तांत आवश्यकता आहे. याचं कारण म्हणजे लॉकडाऊन काळात व्यवसाय ठप्प राहिला तरी, जागा भाडे चुकले नाही. शिवाय व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचा हप्ता चुकला नाही. वीज बिल भरावेच लागले. कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा लागला. प्राॅपर्टी टॅक्स भरावा लागला. वेळे अभावी डेड स्टाॅक काढून टाकावा लागला. घरातील इतर खर्च सुरू होता. असे असताना कोरोना आल्यापासूनच्या सव्वा वर्षाच्या काळात व्यापाऱ्यांचे उत्पन्न शून्य राहिले आणि खर्च मात्र सुरु राहिला. यामुळे व्यापारी वर्ग मोठ्या आर्थिक संकटाला सामोरा जात आहे, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.
पहिल्या लॉकडाऊनच्या काळात हा लॉकडाऊन किती वाढेल याची कल्पना नसल्याने व्यापारी वर्गाने नडलेल्या लोकांना मदत करताना हात अकडता घेतला नाही. त्यांना भरभरून सढळ हाताने मदत केली. मात्र कोरोनाचा काळ वाढला. दुसरी लाट आली. पुन्हा लॉकडाऊन झाला. यामुळे जवळचे पैसे नडलेल्यांच्या मदतीत खर्च करून बसलेला व्यापारी आज मात्र संकटात सापडला आहे. लोकांच्या दृष्टीकोनातून व्यापाऱ्यांकडे खूप पैसा असल्याचे वाटते. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. कर्ज काढून सोने मोडून व्यवसायात आलेला व्यापारी या कोरोनाने हतबल झाला आहे. यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकारकडून व्यापाऱ्यांना मदत होणे ही काळाची गरज आहे. ही मदत कर्जाचे पूनर्गठन करून, एक वर्षासाठी कोणताही हप्ता न देता, शून्य टक्के व्याज दराने तीन वर्षांसाठी कर्ज पुरवठा करून होऊ शकते. असे झाले तर, व्यापार गतीने सुरु होईल. रोजगार वाढेल आणि आर्थिक चक्र वेगाने फिरेल, असेही सचिन निवंगुणे यांनी सांगितले.
महिला व्यापाऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा
विविध व्यापार क्षेत्रात महिला वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर, त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही. घरगुती पदार्थ बनवणारे व्यवसाय, ब्युटीशियनचे व्यवसाय, फॅशन डिझायनर, मेस, मसाले, दिवाळी फराळ, शिलाई, पॅकेजिंग आणि इतर अनेक महिलांचे व्यवसाय आज कोरोनामुळे ठप्प आहेत. सरकारने महिला व्यापाऱ्यांसाठीही विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केली आहे.