पुणे : रस्ते व वाहतूक सुरक्षा हा आपल्या सर्वांच्याच जीवनातील महत्वाचा आणि जवळचा विषय आहे. याविषयीच समाजामध्ये आणखी जागरूकता व्हावी या उद्देशाने पुण्यातील ‘ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एआरएआय’ या संस्थेच्या वतीने वाहतूक सुरक्षा व पर्यावरण ’ या विषयावरील ‘आम्ही व आमची वाहने’ ह्या शीर्षकांतर्गत व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या सोमवार, दिनांक १२ डिसेंबर पासून बुधवार, दिनांक १४ डिसेंबर या दरम्यान घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ ते सायं.८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वासाठी विनामूल्य खुले असणार आहे.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी ‘एआरएआय’ ही संस्था वाहन चाचणी व वाहन क्षेत्राशी निगडीत संशोधन या विषयावर काम करते. ‘एआरएआय’ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार अनिल शिरोळे, केंद्र सरकारच्या रस्ते – वाहतूक मंत्रालयाचे उपसचिव अभय दामले, पुणे महानगर पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता होईल. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांनी या प्रदर्शनातील सर्व व्यंगचित्रे चितारली असून वाहतूक व्यवस्था, वाहनसुरक्षा, वाहतुकीचे नियम, रस्त्यावर रोज घडणारे अनेक किस्से या प्रदर्शनीच्या माध्यमातून नागरिकांना पाहता येतील.