पुणे, –निश्चलनीकरणानंतर रोखरहित व्यवहाराला पर्याय नाही. निश्चलनीकरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल होत आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोखरहित व्यवहाराला प्रोत्साहन द्यावे आणि स्वत:सह कुटूंबियांनासुध्दा रोखरहित व्यवहारामध्ये मोठया प्रमाणावर सहभागी करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ यांनी आज येथे केले.
रोखरहित महाराष्ट्र देशातील पहिले राज्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या योजनेचा जिल्हयात प्रसार व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी अल्प बचत भवन येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रंबधक रघुराम शेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, सहायक महाप्रबंधक दिगंबर वाघमारे, डी.व्ही. टाकळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक दिनकर देशमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी सोरभ राव म्हणाले की, निश्चलनीकरणांनतर देशामध्ये मोठया प्रमाणावर रोखरहित व्यवहार होत आहेत. रोखरहित व्यवहाराला शासकीय कर्मचारी आणि यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. निश्चलनीकरणानंतर अर्थव्यवस्था संक्रमण अवस्थेत आहे. रोखरहित प्रणालीचा अंगिकार करणे ही काळाची गरज असून या प्रणालीत सहभागी न होणारे घटक भविष्यात आर्थिक व्यवहार प्रणालीतून बाहेर फेकले जातील. विकसनशील देशांमध्ये मोठया प्रमाणावर कॅशलेस इकोनॉमी अस्तित्वात आहे. रोखरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने भरपूर सवलती जाहीर केल्या आहेत. समाजातील सर्व घटकांनी याचा लाभ घेऊन रोखरहित व्यवहाराला प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. शासकीय कर्मचाऱ्यांनी रोखरहित व्यवहार प्रणाली ग्रामीण पातळीपर्यत न्यावी अशा स्वरुपाची सूचना करुन कार्यशाळांचे आयोजन जिल्हयातील तहसीलस्तरावर करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक रघुराम शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रोखरहीत व्यवहाराचे फायदे सांगितले. रोखरहित व्यवहार प्रणाली अत्यंत सुरक्षित असून वापरण्यास सोईस्कर असल्याचे सांगितले. रोखरहित व्यवहारामध्ये विविध संस्था, विद्यार्थी, शेतमजुर, कामगार सहभागी करुन घेण्यात येत असल्याचे सांगून ही व्यवस्था ग्रामीण पातळीपर्यत नेण्यात येत असल्याचे सांगितले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहायक महाव्यवस्थापक अपर्णा बापट यांनी यावेळी स्टेट बॅक ऑफ इडियाच्यावतीने ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या एसबीआय फ्रीडम, एसबीआय बडी, नेटबँकींग इत्यादी ऑनलाईन प्रणाली वापरण्याचे प्रात्याक्षिक दाखविले. संगणक व इंटरनेटशिवाय वापरता येणाऱ्या प्रणालींची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.व्ही.टाकळे यांनी केले. या कार्यशाळेस जिल्हयातील विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.