पुणे, ता. २५ जुलै : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर ‘ई र्कॉमर्स’ आणि ‘लॉजस्टिक’ क्षेत्रांचा उद्योगातील वाटा वाढत असून, या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे मत ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे (एनएसडीसी) डॉ. गणेशन यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘ई -कॉमर्स क्षेत्रातील संधी’ या विषयावर डॉ. गणेशन बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, दलित इंडस्ट्री आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे, ‘एनएसडीसी’चे रमेश व्यंकट, बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गणेशन पुढे म्हणाले, ‘बीएमसीसीत एनएसडीसीच्या सहकार्याने सुरू केलेला बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) हा अभ्यासक्रम ई कॉमर्स क्षेत्रातील करिअरसाठी उपयुक्त आहे. या क्षेत्रातील अभ्यासक्रमासह एका वर्षाच्या नामांकित कंपनीतील अप्रेंटिसमुळे प्रात्यक्षिकांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.’
कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम महत्त्वाचे असून, त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात असे मत डॉ. करमळकर यांनी व्यक्त करून अभ्यासक्रमाला शुभेच्छा दिल्या.
व्यंकट म्हणाले, ‘ई कॉमर्स क्षेत्र वेगाने विकसित होत असून त्यात करिअर करण्यासाठी दृष्टिकोन, कौशल्य आणि या क्षेत्रातील ज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे.’
कांबळे म्हणाले, ‘भारत सरकारच्या मेक इन इंडिया, सागरमाला, रस्ते विकास, उडान अशा योजनांमुळे लॉजिस्टिक क्षेत्र विकसित होण्याला मोठे सहाय्य होत आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) या क्षेत्राचा वाटा १४.५ टक्के इतका असून, त्यामुळे देशाला महासत्ता बनविण्यासाठी या क्षेत्राचा मौल्यवान वाटा असणार आहे.’