पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेतील तीस विद्यार्थ्यांनी चरख्यावर सुतकताई करून महात्मा गांधींना १५० व्या जयंतीनिमित्त आगळ्या-वेगळ्या पध्दतीने आदरांजली वाहिली.
तयार झालेल्या सुताच्या गुंड्या वर्धा येथील सेवाग्राममधून पाच मीटर कापडाची निर्मिती करण्यात आली. या कापडापैकी अडीच मीटर कापड राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद आणि अडीच मीटर कापड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठविण्यात येणार असल्याची माहिती मु‘ख्याध्यापक नागेश मोने यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी कणकवली येथील खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष उमेश आंबेगावकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे, डॉ. विनय आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
चरखा हे स्वदेशीचे प्रतिक असून, विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व स्वदेशीची भावना निर्माण करण्यासाठी सुतकताईचा उपक‘म स्तुत्य असल्याचे मत डॉ. कानेटकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. किमान हातरुमाल तयार करण्यापुरती सुतकताई विद्यार्थ्यांना करता आली, तर नवनिर्मितीचा आनंद मिळू शकेल असे मत आंबेगावकर यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम येथील प्रशिक्षक माधव सहस्रबुध्दे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांपूर्वी शाळेने तीन चरखे विकत घेतले. स्वाती जज्जल, विकास पढेर, आनंदा पाटील, प्रीयांका कालचीम या शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिले. गेल्या दोन वर्षांत ३० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शाळा भरण्यापूर्वी सकाळी साडेदहा ते साडेअकरा सुतकताईचे प्रशिक्षण दिले जाते.


