पुणे-आपल्या व्यंगचित्रांचे वाटप करून त्याद्वारे वाहतूक नियमांबाबत जागृती चे कार्य दरवर्षी करणाऱ्या मंगेश तेंडूलकर यांच्या नंतरही त्यांचा उपक्रम राबवून ..आणि पुढे तसाच चालू ठेवण्याचा निर्धार करत तेंडूलकरांच्या स्नेह्यांनी आज त्यांच्या आठवणींना उजाळाही दिला .
ज्येष्ठ व्यंगचित्रकार व समीक्षक मंगेश तेंडुलकर हे सामाजिक कार्यात ही अग्रेसर होते.विशेषतः पुण्यातील वाहतूक समस्येबाबत ते खूपच संवेदनशील होते व नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळले तर रस्ते अपघातात कोणाचा जीव जाणार नाही असे त्यांचे मत होते.मार्मिक व्यंगचित्रांच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन ते करत असत.यासाठी त्यांनी ऐन दिवाळीत नागरिकांना शुभेच्छा देणारे व्यंगचित्र आणि त्यातून वाहतूक नियम पालनाचे आवाहन करणारे भेटकार्ड वाटण्याचा उपक्रम नळस्टॉप चौकात सुरु केला होता.दर वर्षी दिवाळीत चार दिवस ते आपल्या सहकाऱ्यांसह असे हजारो व्यंगचित्र वाटत असत.
त्यांच्या निधनानंतर ही त्यांचा हा उपक्रम सुरु रहावा आणि त्यांच्या स्मृती जागृत रहाव्यात यासाठी त्यांच्या कन्या वंदना तेंडुलकर ढवळे,नात श्रावणी ढवळे,शुभंकर ढवळे यांनी पुढाकार घेतला आणि आज सकाळपासून नळस्टॉप चौकात ह्या उपक्रमाला सुरुवात झाली.तब्बल दहा हजार कार्ड वाटणार असल्याचे वंदनाताई म्हणाल्या.या वेळी पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,ह्या उपक्रमात सुरुवातीपासून सहभागी होणारे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,आपला मुलगा रस्ते अपघातात गमावणारे गुरुसिद्ध्य्या स्वामी आणि सौ शशी स्वामी हे दांपत्य,आपली मुलगी अपघातात गमावणाऱ्या सुनंदा जप्तीवाले,तेंडुलकरांचे स्नेही सौ दीपा देशपांडे आणि श्री किरण देखणे सहभागी झाले होते.
उद्या सकाळी ९:३० वाजता नळस्टॉप चौकात पुन्हा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.